लाखोंच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला अटक

जोगेश्वरीमध्ये विक्री झालेला प्लॉट मालकीचा असल्याचं सांगून तो प्लॉट देण्याच्या नावाखाली एका बांधकाम व्यावसायिकाने ७० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Mumbai
Cheating
फसवणूक

सुमारे ७० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात एका बांधकाम व्यावसायिकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. चिंतन झव्हेरी असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चिंतन हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या चार फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. जोगेश्वरीत एका शेअर ब्रोकरला प्लॉट देण्याचे आमिष दाखवून त्याने दिलेल्या पैशांचा अपहार केल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

कशी केली फसवणूक?

मनिष मारीवाला हे व्यवसायाने स्टॉक ब्रोकर असून सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहतात. पाच वर्षांपूर्वी मनिष यांची त्यांचा मित्र दिनेश चावडा यांच्यामार्फत चिंतन झव्हेरीशी ओळख झाली होती. या ओळखीत चिंतनने तो बांधकाम व्यावसायिक असून त्याचे काही प्रोजेक्ट सुरु असल्याचे सांगितले. त्याच्या मालकीचा जोगेश्वरीतील सरस्वती बाग, इस्मालिया व्हिलेज परिसरात एक मोठा प्लॉट आहे. हा प्लॉट त्यांना विकायचा आहे, तो प्लॉट त्यांनी खरेदी केल्यास आपण त्यांना कमी किंमतीत तो प्लॉट देऊ असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी त्या प्लॉटची पाहणी केली, प्लॉट पसंत पडल्याने त्यांनी तो खरेदी करण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर मनिष यांनी चिंतनला ४१ लाख कॅश आणि २९ लाख चेकद्वारे दिले होते. मात्र ७० लाख रुपये दिल्यानंतरही त्यांना प्लॉटचा ताबा तसेच कागदपत्रे मिळाले नाही. चिंतन हा सतत त्यांना टोलवाटोलवी करीत होता.


हेही वाचा – एटीएम कार्डची अदलाबदल करत तब्बल ६६ हजारांची फसवणूक

आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

दरम्यान, अधिक चौकशीनंतर त्यांना त्याने तो प्लॉट इतर कोणाला तरी विक्री केल्याचे समजले. चिंतनकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांनी चिंतनविरुद्ध बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच चिंतनने अटकपूर्व जामिनासाठी विशेष सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याला गुरुवारी बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलीस तपासात त्याने अशाच प्रकारे वनराई, अंधेरी आणि दिडोंशी परिसरात चौघांची फसवणूक केल्याचे देखील उघडकीस आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here