बुलेट ट्रेनच्या धसक्याने शेतकरी जीवानिशी…!

Mumbai
Goma patil family

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी बाधित होत आहेत. त्यामुळे शेतीवरच उदरनिर्वाह असणारे अनेक शेतकरी कुटूंब हवालदिल झाले आहेत. बुलेट ट्रेनच्या धसक्यामुळेच डायघर गावातील बागायत शेतकरी गोमा पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पिढ्यानपिढ्या सांभाळलेल्या जमिनीवर बुलेट ट्रेनचा नांगर फिरवला जाणार असल्याने या धसक्याने आणखी चार शेतकरी आजारी पडले आहेत. त्यामुळे बुलेट ट्रेनचा हा पहिला बळी असल्याने शेतकरी संतापले आहेत. बुलेट ट्रेनविरोधात आगरी युवक संघटनेने दंड थोपटले असून शेतकरी जीवानिशी जात असल्याने हा लढा अधिकच तीव्र करणार असल्याची भूमिका संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत यांनी आपलं महानगशी बोलताना व्यक्त केली.

बुलेट ट्रेनमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, देसई, पडले, डायघर, डावल, शीळ तसेच भिवंडीतील भरोडी, सुरई, आलिमघर, आजूर दिवे, माणकोली, वडूनवघर, पाये गाव, कशेळी, खारबाव, जुचंद्र, वसई, विरार, पालघर, बोईसर या गावातील जमिनी बाधित होत आहेत. बुलेट ट्रेनचे स्टेशन ठाणे शहरातंर्गत असलेल्या म्हातार्डी येथे स्टेशन होणार आहे. डायघर गावातील बागायत शेतकरी गोमा बामा पाटील यांची सुमारे १२ गुंठे जागा ही बुलेट ट्रेनमध्ये बाधित होत आहे. ६ डिसेंबर २०१८ ला उपविभागीय अधिकारी ठाणे येथे बुलेट ट्रेनची सुनावणी झाली होती. त्यानंतर गोमा पाटील यांच्यासह अनेक शेतकरी हे टेन्शनमध्ये होते.

गोमा पाटील हे डिप्रेशनमध्ये आल्याने ६ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. गोमा पाटील हे बागायती शेतकरी होते. त्यांच्या मृत्यूमुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप पसरला. डिसेंबर महिन्यातच पाटील यांच्याबरोबर लक्ष्मण म्हात्रे हे शेतकरी आजारी पडले आहेत. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शेतकरी रामचंद्र भोईर यांचीही तीन घरे बाधित होणार असल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. डायघर येथील शेतकरी नंदू पाटील यांच्या ३५ खोल्या बाधित होत आहेत. त्या खोल्यांच्या भाड्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे.

जमिनीच्या सर्वेक्षणाच्यावेळी पोलीस बळाचा वापर करून परदेशी यांनी मला आणि माझ्या पत्नीला खेचत पेालीस ठाण्यात नेले, असेही पाटील यांनी सांगितले. तसेच आगासन हद्दीत काही टोलेजंग इमारतींना वाचवण्यासाठी शेतकरी भट्टू म्हात्रे यांच्या जमिनीवर बुलेट ट्रेनचा मार्ग नेला जात आहे. शेतकर्‍यांवर दलालांचा दबाव वाढत असून, पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत यांनी दिली.

गोमा पाटील यांचा मृत्यू हा बुलेट ट्रेनने घेतलेला पहिला बळी आहे. ठाणे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी सुनावणीच्यावेळी शेतकर्‍यांनी पैसे घेतले नाही, तर पैसेही जाणार आणि जमीनही जाणार अशा प्रकारची दमबाजी केली हेाती. त्यामुळेच अनेक शेतकरी चिंतेत सापडले. गोमा पाटील यांच्या मृत्यमुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आजही अनेक शेतकरी आजारी अवस्थेत आहेत. त्यामुळे सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे बुलेट ट्रेन विरोधातील लढा आणखीनच तीव्र होणार आहे.
– गोविंद भगत, अध्यक्ष, आगरी युवक संघटना

पिढ्यानपिढ्या सांभाळलेली जमीन बुलेट ट्रेनमध्ये जाणार. कुटुंबाचे काय होणार, या चिंतेत वडील होते. माझ्या मुलाला काहीही कामधंदा नाही. त्याला नेाकरी द्या याकडे वडीलांनी सुनावणीत लक्ष वेधले होते. पण त्यांच्या बोलण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. सुनावणीवरून आल्यानंतर ते कुणाशीही काहीही बोलत नव्हते. एकदम गप्प झाले होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. जमीन जाणार हीच चिंता शेवटपर्यंत त्यांना लागून होती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. वडीलांच्या मृत्यूला बुलेट ट्रेनच जबाबदार आहे.
– आकाश पाटील, स्व. गोमा पाटील यांचा मुलगा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here