घरमुंबईजड झाले ओझे! मुलांच्या वजनाच्या २५ टक्के बॅगेचे वजन

जड झाले ओझे! मुलांच्या वजनाच्या २५ टक्के बॅगेचे वजन

Subscribe

पालक मात्र बेफिकीरच सरकारचे आदेश धाब्यावर

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र मुंबईसह देशभरातील शाळांमध्ये दिसून आले आहे. ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांची यातून सुटका करण्यासाठी अनेक शाळांनी आयडियाच्या कल्पना लढविल्या तर राज्य सरकारने अध्यादेश काढून शाळांना सक्तीही केली. पण आजही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन वाढत असलेले आढळून येत आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील हे ओझे वाढण्यास जितके शाळा प्रशासन जबाबदार आहे तितकेच पालकही जबाबदार आहेत. त्यामुळे ही वेळ आली आहे. आता या प्रकरणी थेट केंद्र सरकारनेच अध्यादेश जाहीर करत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तराचे ओझे किती असावे हे अधोरेखित केले आहे. त्यामुळे दप्तराचे वजन कमी करण्यासाठी आता नवी लढाई सुरु होणार आहे. यात पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शाळेतील मुलांच्या दप्तरामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक वह्या व पुस्तके भरण्यात येतात. त्यामुळे त्यांना शाळेत जाताना दप्तराचे भलेमोठे ओझे पाठीवर घेऊन जावे लागते. दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांना लहान वयातच अनेक शारीरिक आजारांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने 2014 मध्ये काही उपाययोजना जाहीर केल्या. त्या दृष्टीकोनातून काही शाळांनी प्रयत्नही सुरू केले. परंतु या सूचनांबाबत पालकांकडूनच बेफिकिरी दाखवण्यात येत असल्याने आजही मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाल्याचे पाहायला मिळत नाही. ‘आपलं महानगर’ने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात अनेक शाळांतील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे राज्य सरकारच्या नियमानुसार अधिक असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये मुलांच्या दप्तरामध्ये पाण्याची बाटली, सॅनिटायझर, कोचिंग क्लासची पुस्तके, खेळण्याची कार्ड, इतर पुस्तके, डान्स क्लासची पुस्तके, खेळाचे साहित्य आदी गोष्टी आढळून आल्या. विशेष म्हणजे ज्या मुलांचे आईवडील दोघेही कामावर जातात, अशा मुलांच्या दप्तरामध्ये या वस्तू अधिक असल्याचे आढळून आले. मुलाच्या दप्तरामध्ये काय असावे याबाबत जोपर्यंत पालक सजग होणार नाहीत, तोपर्यंत हे ओझे असेच वाढत जाणार आहे. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाने शाळेतील मुलांच्या इयत्तेनुसार दप्तराचे किती ओझे असावे यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रकच जारी केले आहे. यामध्ये पहिली व दुसरीतील मुलांना गृहपाठ देण्यात येऊ नये, एनसीईआरटीने ठरवल्याप्रमाणे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी फक्त भाषा व गणित या विषयांची पुस्तके आणावी. तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषा, गणित आणि ईव्हीएसची पुस्तके आणावी. त्याशिवाय त्यांना कोणतीही पुस्तके व अन्य साहित्य आणण्यास सांगू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

वजन कमी करण्यासाठी असेही प्रयोग

मुंबईतील अनेक शाळांमध्ये दप्तराचे वजन अधिक असले तरी अनेक शाळांनी दप्तराचे वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यातील एक प्रयोग म्हणजे खार येथील एसएमव्हीएम शाळेने आठवड्यातून एकदाच पुस्तके घरी नेण्याचा निर्णय घेतला. तर माध्यमिक शाळांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकर असलेल्या बेंचची निर्मिती केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका रजंना चौधरी यांनी दिली. मरिन ड्राइव्हच्या एव्हीबी ग्लोबल अकॅडमी खासगी शाळेतही विद्यार्थ्यांच्या बॅगमधील निम्मे साहित्य शाळेतल्या लॉकरमध्ये ठेवण्याची सोय केली आहे. यामध्ये जास्तीच्या वह्या, पुस्तके आणि इतर गोष्टी ठेवण्यात येतात. याबद्दल बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकांता पाठक म्हणाल्या की, विद्यार्थी वह्या, पुस्तके आणि गरजेचे साहित्य घेऊन शाळेत येतात, पण त्याचे ओझे जास्त असल्याने आम्ही हा निर्णय घेतला. बरीच पुस्तके आणि गरजेचे साहित्य घरी ठेवल्यास वेळेवर मिळत नाही. शाळेतील लॉकरमध्ये ठेवल्यास त्या सहज मिळतात. पालकांना बॅग भरतानासुद्धा जास्त त्रास होत नाही. बर्‍याच वेळा बॅग भरताना होमवर्क आणि पुस्तके राहून जातात तेच सगळे साहित्य शाळेत ठेवल्यास ओझ्याचे प्रमाण कमी होते.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी असावे हीच आमची भूमिका आहे. त्यानुसार सरकारने जाहीर केलेल्या जीआरनुसार आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहोत. परंतु विद्यार्थ्यांच्या दप्तरात मोठ्या प्रमाणात अन्य गोष्टी आढळून येतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी शाळांवर टाकणे चुकीचे आहे. पालकांची काही नैतिक जबाबदारी आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे.
– प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

केेंद्र सरकारने जाहीर केलेले इयत्तेनुसार दप्तराचे ओझे
इयत्ता दप्तराचे ओझे (किलोमध्ये)
पहिली ते दुसरी –  1.5
तिसरी ते पाचवी – 2 ते 3
सहावी ते सातवी – 4
आठवी ते नववी – 4.5
दहावी         –     5

५०० मिलीच्या वॉटरबॉटेलचे वजन – २५ ते ५० ग्रॅम
कंपास पेटीचे वजन – १४० ते १८० ग्रॅम
टीफीन बॉक्सचे वजन – ३०० ते ४०० ग्रॅम
एका शंभर पानी वहीचे वजन – १०५ ग्रॅम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -