कॅन्सर असल्याची बतावणी करुन व्यावसायिक महिलेची फसवणूक

Mumbai
Fraud
प्रातिनिधिक फोटो

कॅन्सर असल्याची बतावणी करुन एका फ्लॉअर शॉप व्यावसायिक महिलेकडून सुमारे पावणेचार लाख रुपये घेऊन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच गोवा येथून पळून गेलेल्या आरोपी महिलेस वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. दविना डेव्हीड बेनेट ऊर्फ डव्हिना कौर असे या ३० वर्षांच्या महिलेचे नाव असून तिने तक्रारदार व्यावसायिक महिलेच्या बँक खात्यात बोगस चार लाख रुपये जमा केल्याची पावती दाखवून ही फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदार विनिता जयप्रकाश या अंधेरीतील वर्सोवा-यारी रोडवरील बियंका अपार्टमेंटमध्ये राहत असून त्यांच्या मालकीचे फ्लॉअर शॉप आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची डव्हिना कौर या तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही एकमेकांच्या चॅटवरुन संपर्कात होते. २५ डिसेंबर २०१८ रोजी डव्हिना कौर ही त्यांच्या शॉपमध्ये आली होती. तिने तिचा एटीएम ब्लॉक झाला असून त्यांना कॅन्सर हा आजार आहे. तातडीने किमोथेरेपी करायची असल्याने तिने त्यांच्याकडे तीस हजार रुपये मागितले. ही रक्कम नंतर त्यांच्या बँक खात्यात ट्रॉन्स्फर करु, असेही तिने सांगितले.

त्यानंतर विनिता यांनी तिला तीस हजार रुपये देऊन त्यांचा बँक खात्याचा क्रमांक दिला होता. दोन दिवसांनी तिने त्यांना व्हॉटअपवर चार लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केल्याची पावती पाठविली होती. यावेळी तिने त्यांना तिची मुलगी एव्ही हिचे निधन झाले असून अंत्यविधीसह इतर कार्यक्रमांसाठी पैशांची गरज आहे. तिचा एटीएम ब्लॉक असल्याने त्यांना ही रक्कम काढून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर तिने त्यांच्याकडून दोन लाख रुपये तसेच नंतर ५० हजार रुपये दिले होते. मात्र तीन दिवसांनी त्यांच्या बँकेत चार लाख रुपये जमा झाले नव्हते. यावेळी तिने बँकेत केवायसी जमा करायचे आहे. सात दिवसांनी ही रक्कम जमा होईल, असे सांगून त्यांच्याकडून आणखीन एक लाख रुपये घेतले होते.

२५ डिसेंबर २०१८ ते ५ जानेवारी २०१९ या कालावधीत तिने विविध कारणे सांगून त्यांच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र या कालावधीत तिने जमा केलेले चार लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते. याबाबत तिने तिच्याकडे वारंवार विचारणा केली असता ती तिला टाळू लागली होती. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच विनिता यांनी वर्सोवा पोलिसांत तिच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी डव्हिनाकौरविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच ती पळून गेली होती. तिचा शोध सुरु असताना ती गोवा येथील आयटसी हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वर्सोवा पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने डव्हिनाकौर हिला अटक केली. चौकशीत ती मूळची कर्नाटकच्या बंगलोर शहराची रहिवाशी असून सध्या अंधेरीतील यारी रोडवरील सुमन अपार्टमेंटमध्ये राहते. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असून तिने अशाच प्रकारे अन्य काही गुन्हे केले आहेत का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here