भिवंडीत कर्जबाजारी व्यापाऱ्याची आत्महत्या

मुकेश नागडा यांचा यंत्रमागाचा व्यवसाय होता. व्यापारात मंदी आल्यामुळे त्यांनी बँक आणि सावकारांकडून कर्ज घेतले होते.

Bhiwandi
Businessman commits Suicide
कर्जबाजारी व्यापाऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून भिवंडीमध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. राहत्या इमारतीच्या सातव्या माळ्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली आहे. ही घटना भिवंडीच्या अशोकनगर भागामध्ये शनिवारी घडली आहे. मुकेश प्रेमचंद नागडा (५६ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मुकेश नागडा हे गेल्या काही दिवसांपासून एका दुर्धर आजरानेही ग्रासले होते. त्यामुळे त्यांनी कर्जबाजारीपणामुळे की आजाराला कंटाळून आत्महत्या केली ? याबाबत उलटसुलट बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण ?

मुकेश नागडा यांचा यंत्रमागाचा व्यवसाय होता. मात्र गेल्या पाच वर्षांपासून यंत्रमाग व्यवसायात मंदी असल्याने संपूर्ण व्यवसाय डबघाईला आला होता. त्यामुळे त्यांनी व्यवसायासाठी बँक आणि सावकरांकडून व्याजाने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्याचे सांगण्यात येत आहे. व्यापारात मंदी असल्याने कर्जाचे डोंगर वाढत चालले होते. त्यामुळे कर्ज फेडायचे कसे ? अशी चिंता मुकेश यांना सारखी सतावत होती. कर्जाच्या चिंतेने ग्रासलेल्या मुकेश यानी शनिवारी राहत असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.