आदेशानंतरही खासगी दवाखाने, रूग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द

आदेशानंतरही ठाणे शहरातील खासगी दवाखाने आणि रुग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द केले जाणार आहेत.

Thane
canceled there licence who private doctors close down there clinics in thane
आदेशानंतरही खाजगी दवाखाने, रूग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द

ठाणे शहरातील खासगी दवाखाने आणि रुग्णालये बंद असल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. खासगी दवाखाने आणि रूग्णालये बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील, असे आदेश प्रशासनाने देऊन सुध्दा ज्या खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले नाहीत अशा खासगी डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.

तातडीने दवाखाने सुरू करावेत

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र बंदची घोषणा झाल्यानंतर शहरातील सर्व दवाखाने खासगी रुग्णालय बंद ठेवण्यात आली असून त्यामुळे सामान्य रुग्णांची गैरसोय होत आहे. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे खासगी दवाखाने, रुग्णालये यांनी आपली सेवा सुरु ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून साथीचे आजार आणि अन्य छोट्या आजारांसाठी रुग्णांना रुग्णसेवा नेहमीप्रमाणे सहज उपलब्ध होऊ शकते. मात्र, खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांनी या सूचना पाळलेल्या नाहीत. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एकीकडे करोना नियंत्रणात आणण्यासाठी मोठी शासकीय रुग्णालये काम करत असताना नियमित सर्दी खोकला आणि साथीचे आजार असणाऱ्या रुग्णांचा ताण या शासकीय रुग्णालय वर येत आहे. त्यामुळे तातडीने शहरातील छोटे दवाखाने खासगी रुग्णालय प्रसूतिगृह या सेवा सुरू कराव्यात, असे आदेश देऊन सुद्धा अद्याप खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. आदेश देऊनही जर शहरातील खासगी दवाखाने, रुग्णालये यांनी आपली सेवा नियमित सुरू केली नाही अशा दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरु करावी, असे स्पष्ट निर्देश महापौरांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, सध्याची युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता खासगी दवाखाने, रूग्णालये यांनी आपली सेवा तात्काळ सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने दवाखाने सुरू करावेत, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.


हेही वाचा – मुंबईकरांनो, मदतीसाठी हे आहेत संपर्क क्रमांक