व्यसनग्रस्त कुटुंबातील सहचरींना ‘कॅन्टीन’चा आधार

व्यसनग्रस्त कुटूंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘आयपीएच' या संस्थेच्या वतीने ‘कॅन्टीन' उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Thane
'sahachari' kitchen
'सहचरी' किचन

व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीचे अध:पतन होतेच. पण या व्यसनाचा त्याच्या कुटुंबावर देखील परिणाम होतो. विशेषत: व्यसनी व्यक्तीच्या पत्नीला खूप मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्याच्या पत्नीचेदेखील समुपदेशन करावे लागते. ठाण्यातील ‘आयपीएच’ या संस्थेच्या वतीने प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या आवारातील सप्तसोपान येथे व्यसनी व्यक्तींच्या पत्नींसाठी ‘सहचरी समूह’ कार्यरत असून अलिकडेच त्यांच्यामार्फत संस्थेत अद्ययावत कॅन्टीन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

नाश्ता, जेवण, चहा-कॉफीचा पुरवठा

व्यसनी व्यक्तीमुळे त्या कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडते. व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे अनेकदा व्यसनाधीन व्यक्तीला नोकरीवरही पाणी सोडावे लागते. अशा परिस्थितीत कुटुंबातील स्त्रीला खंबीरपणे परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर्थिक स्थैर्याची गरज असते. ही गोष्ट विचारात घेऊन ‘आयपीएच’ने ‘सहचरी समूहा’साठी ‘कॅन्टीन’ उपक्रम सुरू केला आहे.
आयपीएचच्या आवारात दररोज विविध कार्यशाळा, चर्चासत्रे, मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी नाश्ता, जेवण, चहा-कॉफी आता या कॅन्टीनमधून पुरवली जाणार आहे.

मागणीनुसार बनवले जातात पदार्थ

सध्या या कॅन्टीनमध्ये सहा महिलांना पूर्णवेळ रोजगार मिळाला आहे. या महिलांना दरमहा वेतन दिले जाते.
या कॅन्टीनमध्ये नाश्त्यामध्ये कटलेट, वडापाव, साबुदाणा वडा, ब्रेडरोल, सॅन्डविच, पौष्टीक घावणं, इडली चटणी, मोदक, निरनिराळ्या उसळी, पुलाव, मसाले भात आदी जिन्नस मागणीनुसार बनविले जातात. आयपीएचने कॅन्टीनमध्ये अत्याधुनिक किचन साहित्य दिले आहे. गेल्या दोन आठवड्यात या कॅन्टीनला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली.

हा तर दुग्धशर्करा योग

पूर्वी ‘सहचरी समूहा’मध्ये आम्हाला चांगले मार्गदर्शन करण्यात येत होते. तणावपूर्ण परिस्थितीत कसे वागायचे हे आम्ही एकमेकींच्या अनुभवाने शिकलो. आता आयपीएचने कॅन्टीन चालविण्यासाठी दिल्याने रोजगाराचाही प्रश्नही सुटला आहे. या ठिकाणी दिवसभर सख्यांसोबत काम करताना दिवस मजेत जातो. पुन्हा त्याचे पैसेही मिळणार आहे, त्यामुळे हा तर दुग्धशर्करा योग असे ‘कॅन्टीन’मध्ये कार्यरत एका महिला कर्मचारीने सांगितले.

कोणतेही व्यसन व्यसनाधीन व्यक्तीबरोबरच त्याच्या कुटुंबाचेही नुकसान करते. विशेषत: त्या व्यक्तीच्या पत्नीला त्याचा सर्वाधिक त्रास होतो. अशा कुटुंबातील मुलांसाठी आम्ही ‘अंकुर स्वमदत गट’ सुरू केला. त्याचबरोबर पत्नींसाठी ‘सहचरी’ हा ‘स्व मदत गट’ काम करतो. ‘कॅन्टीन’द्वारे त्यांना आता मानसिक स्थैर्याबरोबरच आर्थिक मदतही होऊ शकेल.
डॉ. आनंद नाडकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ