मुंबईतील दहा रस्त्यांवर लवकरच कार पार्किंगला बंदी

मुंबईतील वाहनतळाशेजारील ५०० मीटर परिसरात अनधिकृत उभ्या करण्यात येणार्‍या वाहनांवरील (कार पार्किंग) कारवाई सुरु असतानाच आता दहा रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी केली जाणार आहे.

Mumbai
no-parking area in mumbai
अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई

मुंबईतील वाहनतळाशेजारील ५०० मीटर परिसरात अनधिकृत उभ्या करण्यात येणार्‍या वाहनांवरील (कार पार्किंग) कारवाई सुरु असतानाच आता दहा रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी केली जाणार आहे. भायखळा ते शीव पर्यंतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरसह मुंबईतील १० रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर वाहने उभी करण्यास बंदी केली जाणार असून या रस्त्यांवर वाहने उभी केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मुंबईतील २७ वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात अनधिकृत वाहने उभी केल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाईची मोहिम महापालिकेने मागील रविवारपासून हाती घेतली आहे. या दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी होत असताना आता रस्त्यांवरील अनधिकृत वाहनतळांना लगाम घालण्यासाठी महापालिकेने दहा रस्त्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या दहाही रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर अनधिकृत वाहने उभी करण्यास बंदी घातली जाणार आहे. महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी रस्ते विभागासह संबंधित सर्व विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना आदेश बजावत पहिल्या आठवड्यात लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.

आयुक्तांनी दिलेल्या निर्देशात दुचाकींना हात न लावता प्रथम कमर्शियल वाहनांवर कारवाई करावी. त्यानंतर इतर वाहनांवर कारवाई करावी. परंतु इतर वाहनांवर कारवाई करताना, स्थानिक रहिवाशांच्या वाहनांवर त्वरीत कारवाई करू नये, अशाही सूचना केल्या आहेत. बाहेरुन आलेल्या वाहनांवर कारवाई केल्यानंतर रहिवाशांना सूचना देवून त्यांना आपली वाहने कुठे उभी करता येतील, याबाबत सूचना कराव्यात. त्यानंतर अंदाज घेवून शेवटच्या टप्प्यात दुचाकींवर कारवाई केली जावी, असे निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, स्थानिक वाहनांचा डेटाही महापालिकेने तयार करावा, असेही निर्देश दिले आहेत.