घरमुंबईपुरात मरणाची शि'रि'क्षा

पुरात मरणाची शि’रि’क्षा

Subscribe

बेकायदा बांधकामात नाले, गटारे बुजवल्यामुळे वसई-नालासोपार्‍यात पूर आला. या पुरामुळे गुडघाभर पाणी साचल्यानंतर आणि महापालिका किंवा संबंधित यंत्रणांकडून वेळीच मदत उपलब्ध न झाल्याने रिक्षाच्या टपावरून मृतदेह नेण्याची वेळ नालासोपार्‍यातील जायस्वाल कुटुंबियांवर आली.

बेकायदा बांधकामात नाले, गटारे बुजवल्यामुळे वसई-नालासोपार्‍यात पूर आला. या पुरामुळे गुडघाभर पाणी साचल्यानंतर आणि महापालिका किंवा संबंधित यंत्रणांकडून वेळीच मदत उपलब्ध न झाल्याने रिक्षाच्या टपावरून मृतदेह नेण्याची वेळ नालासोपार्‍यातील जायस्वाल कुटुंबियांवर आली. मात्र जायस्वाल यांचा मृत्यू अनैसर्गिक होता. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन का झाले नाही. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात नोंद का झाली नाही. जवळपासचे नागरिक रिक्षातून जाणारी ही अंत्ययात्रा पाहात होते. मात्र कुणालाही पोलीस, आपत्कालीन यंत्रणांना कळवण्याची, मदत करण्याची तसदी घ्यावीशी का वाटली नाही, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

विजेच्या झाला धक्क्याने मृत्यू 

नालासोपार्‍यातील वेदांत इमारतीमधील राजकुमार किशोरीलाल जायस्वाल (४०) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यानंतर पावसामुळे आणि रस्त्यात झालेल्या गुडघाभर पाण्यामुळे शेजार्‍यांनीही अंत्ययात्रेत येण्यास नकार दिला. त्या गेलेल्या जिवासाठी मार्गातील पाण्यातून वाट काढत आपला असलेला जीव धोक्यात घालण्याची कुणाचीही तयारी नव्हती. अशा परिस्थितीत जायस्वाल यांना रिक्षातून नेण्याचे ठरले. पण कंबरेइतक्या पाण्यातून रिक्षा चालवणार कशी हा प्रश्न होता. त्यानंतर तीनचार कुटुंबिय, एकदोन नातेवाईक आणि चारपाच मित्रांनी रिक्षा पाण्यातून ढकलत जायस्वाल यांचा हा अखेरचा प्रवास साचलेल्या पाण्यातून पूर्ण केला.

- Advertisement -

बेकायदा बांधकामांमुळे हा परिसर पाण्यात

नालासोपारा आणि परिसरातील बेकायदा बांधकामांमुळे हा परिसर पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास 90 टक्के म्हणजे सर्व शहरातच बेकायदा बांधकामे झाली आहेत. गटारी, नाले बुजवून, त्यांचे प्रवाह वळवून ही मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. त्याचाच परिणाम नालासोपारा जलमय होण्यात झाला. जुलैच्या 9 ते 11 तारखेदरम्यान नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर, समर्थ नगर, पांचाळ नगर, मोरेगांव, श्रीप्रस्थ, समेळपाडा, लक्ष्मीबेन छेडा नगर, पाटणकर पार्क, चाणक्यनगरी पाण्याखाली बुडाली होती. येथील तळमजल्यावरील घरांमध्येही गुडघाभर पाणी साचले होते. तसेच स्टेशन ते मोरेगांव, सोपारागांव, श्रीप्रस्थ या मुख्य रस्त्यांवर चार ते पाच फूट पाणी तुंबले होते. त्यामुळे हजारो लोक घरात अडकून पडले होते. अशा बिकट परिस्थितीत सोमवारी सायंकाळी नालासोपारा पश्चिमेकडील समर्थ नगरातील नागरिक एका वेगळ्या कारणामुळे साचलेल्या पाण्यापुढे हतबल ठरले होते.

जेमतेम सहा-सात जण झाले अंतयात्रेत सहभागी

वेदांत इमारतीतील राजकुमार जायस्वाल (40) यांचे ९ तारखेला सायंकाळी विजेच्या धक्क्यामुळे निधन झाले. या भागातील महसूल विभागाच्या जमिनीवर आणि खारभुमीजवळ उभ्या राहिलेल्या समर्थ नगरची परिस्थिती सर्वात बिकट होती. खडकाळ-मातीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात तुंबलेले पाणी या पाण्यातून वाहणारे मलमूत्र, दळण-वळणाची सर्व साधने बंद अशा परिस्थितीत जायस्वाल यांचा सायंकाळी 7 वाजता मृत्यू झाला. त्यानंतर या परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. रात्री 11 वाजेपर्यंत मृत्यूचा दाखला वगैरे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर काळोखात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मात्र, सर्वजण आपापल्या घरात अडकून पडल्यामुळे जेमतेम सहा-सात जण यात्रेत सहभागी झाले.
चार-पाच बांबू कसेबसे गोळा करून तिरडी तर बांधली. मात्र,त्यांना साचलेल्या पाण्यातून प्रेताचा भार वाहता येईना.

- Advertisement -

प्रेत  ठेवावे लागले रिक्षाच्या टपावर 

मोबाईलचे नेटवर्कही बंद झाल्यामुळे मदतीसाठी कोणालाही बोलवता येईना. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. जागोजागी तुंबलेल्या पाण्यातून दोन किलोमीटर अंतरावर असलेली समेळापाडा स्मशानभूमी तिरडीला खांदा देवून गाठणे अशक्यप्राय झाले. त्यामुळे एका नागरिकाने आपली रिक्षा आणली. मात्र,रिक्षाही पाण्याच्या प्रवाहात सुरू झाली नाही. मग जायस्वाल यांचे प्रेत रिक्षाच्या टपावर ठेवण्यात आले. एकाने मडक्याची शिकाळी खाली पाणी असल्याने डोक्यावर धरली. त्यांच्या मागोमाग उर्वरित सहाजणांनी रिक्षा हाताने ढकलत-ढकलत समेळपाडा स्मशानात नेली.

स्मशानाची दारे बंद

पाणी भरल्यामुळे आणि पाऊस पाण्यात सरपटणारे साप बाहेर आल्यामुळे समेळपाडा स्मशानभूमी बंद करण्यात आल्याचे महापालिकेच्या स्मशानातील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पूर्वेकडील तीन किलोमीटर दूर असलेल्या तुळींज येथील स्मशानात रिक्षावर ठेवलेले जायस्वाल यांचे कलेवर वाहून नेण्यात आले. तब्बल पाच किलोमीटर येथील नागिरकांनी रिक्षा ढकलत अंत्ययात्रा नेली.त्यानंतर जायस्वाल यांच्या प्रेताला अग्नी देण्यात आला. या गडबडीत मात्र, त्यांच्याकडून पोलीस ठाण्यात वर्दी देण्याची चूक झाली.

महापारेषणच्या ढिसाळ कारभाराचा वीज बळी

जायस्वाल यांचा बळी महापारेषणच्या खुल्या राहिलेल्या वायरने घेतल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. मात्र,अज्ञानामुळे त्यांनी त्यावेळी महापारेषण किंवा पोलिसांनी ही खबर दिली नाही. जायस्वाल यांना 3 आणि 5 वर्षांची दोन तान्ही मुले आहेत. वरील सोपस्कार त्यांनी पूर्ण केले असते, तर भरपाई मिळण्याची शक्यता होती. जायस्वाल यांच्या प्रेताचे अशाप्रकारे हाल झाल्यामुळे महापालिका की महापारेषण यांच्यात चूक कोणाची हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. चूक कोणाचीही असली तरी भोग मात्र,त्यांच्या पश्चात निराधार झालेल्या कुटुंबाला भोगावे लागणार आहेत.

 

या काळात पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुरु होती. जायस्वाल यांच्या हितचिंतक, नातलगांनी किंवा तेथील रहिवाशांनी या यंत्रणेशी संपर्क साधला असता, तर त्यांना नक्कीच मदत मिळाली असती. निळेगांवातही अंत्ययात्रेत अशीच समस्या उद्भवली होती. त्याठिकाणी पालिकेने शववाहिनी पाठवली होती.
– बुधाजी शेळके, सहाय्यक आयुक्त, वसई विरार महानगरपालिका

आमच्या वेदांत इमारतीखाली असलेल्या डिपीजवळ त्यांना शॉक लागला. पावसामुळे वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. वीजपुरवठा यंत्रणेकडून तात्काळ पावले उचलली नाहीत.
– ऋतिक जायस्वाल, मृत किशोरीलाल जायस्वाल यांचा पुतण्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -