घरमुंबईउल्हासनगरात पुन्हा लाखोंची रोकड जप्त; ४ दिवसांत चौथी कारवाई!

उल्हासनगरात पुन्हा लाखोंची रोकड जप्त; ४ दिवसांत चौथी कारवाई!

Subscribe

निवडणूक भरारी पथकानं कल्याणजवळच्या उल्हासनगरमध्ये ७१ लाखांची रोकड जप्त केली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात लोकसभेसाठी मतदान होत असताना दुसरीकडे पोलीस कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त होत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांना लाखो रुपयांची रोकड सापडली आहे. मंगळवारी जेव्हा राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत होतं, तेव्हा कल्याणजवळच्या उल्हासनगरमध्ये तब्बल ७१ लाख रुपयांची रोकड निवडणूक भरारी पथकाने जप्त केली आहे. ही रोकड नक्की कशासाठी वापरली जात होती? याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असून इन्कम टॅक्स विभागाला देखील यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

कशी पकडली रक्कम?

मंगळवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरमधल्या आचारसंहिता भरारी पथकाने नोडल अधिकारी युवराज भदाणे यांच्या पथकानं एका कारमधून सुमारे ७१ लाख रुपयांची बेहिशोबी रक्कम जप्त केली आहे. शहरातल्या शांतीनगर प्रवेशद्वाराजवळ एमएच ४६ डी १७३७ या क्रमांकाची एक कार संशय आल्यामुळे भरारी पथकानं तपासणीसाठी थांबवली. या कारची तपासणी केली असता कारमध्ये एक लोखंडी पेटी आढळून आली. या पेटीमध्ये १००, २००, ५०० आणि २००० च्या नोटा अशी मिळून सुमारे ७१ लाख रुपयांची रक्कम ताब्यात आली.

- Advertisement -

एटीएमच्या नावाखाली रोकडचा व्यवहार?

ड्रायव्हरकडे तपासणी केल्यानंतर ही रोकड ‘लॉर्जिकल’ नावाच्या कंपनीच्या एटीएमची असल्याचा दावा त्याने केला. त्यासाठी ड्रायव्हरकडे एक चलान सोडलं, तर बाकी काहीही पुरावा नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेबाबत निश्चित माहिती न मिळाल्यामुळे भरारी पथकानं मध्यवर्ती पोलीस ठाण्याकडे ही रक्कम सुपूर्द केली. तसेच, ‘हा एटीएमच्या नावाखाली लाखो रुपयांचा व्यवहार असण्याची शक्यता असून हा प्रकार इन्कम टॅक्स विभागाला कळवण्यात येणार आहे. या बेहिशोबी रोकडचा तपास पोलीस करत आहेत’, अशी माहिती पथकाचे प्रमुख युवराज भदाणे यांनी दिली.

आत्तापर्यंतची चौथी कारवाई

युवराज भदाणे आणि त्यांच्या पथकानेच २० तारखेला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास म्हारळ नाक्यावर अलब्रत नाडर नावाच्या व्यक्तीच्या कारमधून ६ लाख ५० हजार रुपये, त्याच रात्री ११ वाजता साईबाबा मंदिराजवळ वाईन शॉप असणारे व्यापारी रवी रायसिंघानी यांच्या कार मधून ५ लाख रुपये, २१ तारखेला म्हारळ जवळ जुन्नर पुणे येथून येणारे व्यापारी राहुल आहुजा यांच्या कारमधून ४ लाख १० हजार रुपये अशी बेहिशोबी रोकड पकडली होती. आजची ७१ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड ही मोठी कारवाई असून उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -