मालाड, देवनारमध्ये प्राण्यांसाठी स्मशानभूमी

लंडनमधील कंपनीची निवड,देशातील पहिली महापालिका

Mumbai
प्राणी

मुंबईत मोठ्याप्रमाणात पाळीव कुत्रे व मांजरे असून वयोमानानुसार तसेच आजारांमुळे त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यासाठी देवनार व मालाडमध्ये स्मशानभूमी उभारण्यात येणार आहेत. या स्मशानभूमी सीएनजीवर आधारीत असून त्या लंडनमधील कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. पाळीव प्राण्यांसह भटके कुत्रे आणि मांजरांवरही याठिकाणी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांच्या धडकेने भटके कुत्रे तसेच मांजरे जखमी अथवा मृत होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उच्च न्यायालयाने प्राण्यांच्या मृत शरीराचे दहन करण्याचे आदेश दिले आहेत. प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६० आणि प्राणी जनन नियंत्रण नियमावली २००१ अन्वये प्राण्यांसाठी दहनभट्टीची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महालक्ष्मी, मालाड व देवनार येथील श्वान नियंत्रण कार्यालयाच्या जागेवर पीएनजीवर आधारीत दहनभट्टी उभारण्याचे निश्चित केले होते. त्यापैकी महालक्ष्मी येथील जागेवर टाटा ट्रस्टच्या माध्यमातून दहनभट्टी उभारण्यात येत आहे. त्यामुळे मालाड व देवनार येथे अत्यंसंस्कारासाठी स्मशानभूमी बनवण्यासाठी लंडनमधील कंपनीची निवड करण्यात आली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खाजगी अंत्यसंस्कार स्थळ आहे. ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवले जाते. तर महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट बोरिवली परिसरातल्या ‘कोरा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे लावली जाते.

गुरांचा कोंडवाडा असलेल्या मालाड येथे प्रत्येक ताशी ५० किलो व देवनार येथे प्रत्येक ताशी ५०० किलो एवढ्या क्षमतेच्या दहनभट्ट्या बसवण्यात येणार आहेत. या दहनभट्ट्यांचा पुरवठा, उभारणी, चाचणी घेऊन बसवल्यानंतर पुढील पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीच्या कंत्राटाचा समावेश आहे. यासाठी लंडनमधील अनिथा टेक्सकॉट कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी १७ कोटी ८०लाख २९ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणार्‍या प्राण्यांच्या स्मशानभूमीत परवाना असलेले पाळीव कुत्रे व मांजरांवरच अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तसेच जे भटके कुत्रे नोंदणीकृत असतील त्याच्याच मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. प्राण्यांसाठी पर्यावरणपूरक स्मशानभूमी उभारणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मालाड व देवनार येथे प्राण्यांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी पीएनजीवर आधारीत दहनभट्टी उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबतची निविदा प्रक्रीया पूर्ण झाली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीला मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. समितीच्या मान्यतेनंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. टाटा संस्थेच्यावतीने महालक्ष्मी दहनभूमी उभारण्यात येत असल्याने मालाड व देवनार या दोन भागात महापालिकेच्यावतीने स्मशानभूमी उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईतील भटके प्राणी
प्राणी गणना २०१२ नुसार संपूर्ण मुंबईत ३३ हजार ५७२ कुत्रे आहेत. तसेच सन २०१४ मध्ये महापालिकेच्यावतीने केलेल्या गणनेनुसार मुंबईत ९५ हजार १७२ भटके कुत्रे आहेत. यापैकी सुमारे ७० हजारांहून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. हे निर्बिजीकरण ‘ऍनीमल बर्थ कंट्रोल प्रोग्रॅम’ अंतर्गत करण्यात आले होते. सध्या महापालिका क्षेत्रात तीनशेपेक्षा अधिक पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here