गर्भाशयाच्या आजारासंदर्भातील औषधावर केंद्राकडून बंदी

४० वर्ष वयोगटातील महिलांमध्ये साधारणपणे होणार युटेरिन फायब्रॉईड्स या आजारावर डॉक्टरांकडून देण्यात येणार्‍या युलिप्रिस्टल अ‍ॅसेटेट औषधामुळे महिलांचे यकृत निकामी होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

fibroid

गर्भाशयातून होणारा रक्तस्त्राव आणि असह्य वेदनांसाठी वापरण्यात येत असलेले युलिप्रिस्टल अ‍ॅसेटेट हे औषधच महिलांसाठी घातक ठरत असल्याचे उघडकीस आले आहे. ४० वर्ष वयोगटातील महिलांमध्ये साधारणपणे होणार युटेरिन फायब्रॉईड्स या आजारावर डॉक्टरांकडून देण्यात येणार्‍या युलिप्रिस्टल अ‍ॅसेटेट औषधामुळे महिलांचे यकृत निकामी होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे औषधापेक्षा इलाज भयंकर असल्याने केंद्र सरकारने युलिप्रिस्टल अ‍ॅसेटेट या औषधावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चाळीशी ओलांडल्या बहुतांश महिलांच्या गर्भाशयामध्ये युटेरिन फायब्रार्सड्सचा वाढू लागल्याने त्यांना त्रास जाणवू लागतो. यामध्ये महिलांच्या गर्भाशयातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे, त्यांच्या गर्भाशयात असह्य वेदना होणे यासारखे त्रास होऊ लागतात. या आजारांवर अनेक डॉक्टरांकडून अन्य उपचाराबरोबरच महिलांना युलिपिस्टल अ‍ॅसेटेट हे औषध दिले जाते. पण या औषधामुळे महिलांचे यकृत निकामी होण्याचा धोका असल्याचे नुकत्याच एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे महिलांसाठीचे औषधच त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सी असलेल्या फार्माकोव्हिजिलन्स रिस्क असेसमेंट कमिटीकडून (प्रॅक) मे २०१८ मध्ये यावर शिक्कामोर्तब केले आहे. युरोपमधील तीन महिलांना यकृताच्या गंभीर आजार झाल्याने त्यांना यकृताचे प्रत्यारोपण करावे लागल्याची प्रकरणे प्रॅककडे आली होती. त्यावर त्यांनी केलेल्या अभ्यासात युलिपिस्टल अ‍ॅसेटेट ५ मिलीग्रॅम इतके औषधांमुळे महिलांचे यकृत निकामी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी केलेल्या संशोधनात ही बाब अधोरेखित झाली. त्यामुळे युलिपिस्टल अ‍ॅसेटेट हे घटक असलेल्या ‘आयस्म्या’ औषधावर फिलिपाईन्स,मलेशिया, थायलंड, सिंगापूर, आर्यलँड, दुबई या देशामध्ये बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर बाजारामध्ये असलेले औषधेही पुन्हा मागवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय ड्रग कंट्रोलर जनरल डॉ. व्ही.जी. सोमानी यांनी भारतातही युलिपिस्टल अ‍ॅसेटेट या औषधावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

युलिपिस्टल अ‍ॅसेटेट या औषधाचा वापर युटेरिन फायब्रॉईड्ससारख्या आजारासाठी वापरले जाते. या औषधाच्या वापरानेे यकृत निकामी होत असल्याचे संशोधनातून उघडकीस आले आहे. त्यामुळे बाजारातून हे औषध मागे घेण्याबरोबरच उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालावी, यासदंर्भात आम्ही राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन