घरमुंबईसंविधानाच्या विक्रीबाबत केंद्राचे दुटप्पी धोरण

संविधानाच्या विक्रीबाबत केंद्राचे दुटप्पी धोरण

Subscribe

पुस्तक विक्रीवर सवलत देण्यास नकार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘भारतीय संविधाना’ला आंबेडकर अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शिवाजी पार्कमध्ये लावण्यात येणार्‍या स्टॉल्सवरून लाखो रुपयांच्या ‘भारतीय संविधाना’च्या प्रतींची विक्री होते. महाराष्ट्र सरकारतर्फे शिवाजी पार्क बाहेर लावण्यात येणार्‍या पुस्तक स्टॉलवर 58 प्रकारची पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात येतात. महाराष्ट्र सरकारच्या स्टॉलवरील सर्व पुस्तकांवर 10 टक्के सवलत देण्यात येते. परंतु केेंद्राकडून सूट देण्यात येत नसल्याने ‘भारतीय संविधान’ व ‘बहिष्कृत भारत’ या दोन ग्रंथांवर सवलत देण्यास नकार दिला जातो. देशाचा कारभार चालणार्‍या ग्रंथावर सवलत देण्यास केंद्र सरकार सवलत देण्याबाबत उदासीनता दाखवत असल्याने आंबेडकर अनुयायांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.

देशाची राज्यघटना असलेले ‘भारतीय संविधान’ला आंबेडकर अनुयायांमध्ये प्रचंड मागणी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये लावण्यात येणार्‍या प्रत्येक स्टॉलमध्ये दररोज 100 प्रतींची विक्री होत असते. स्टॉलवर विकण्यात येणार्‍या ‘भारतीय संविधाना’ची किंमतही 250 रुपयांपासून सुरू होत असते. यामध्ये पुस्तकाची बांधणी, प्रिटींग व कलरनुसार किंमत बदलत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकाच्या शासकीय मुद्रणालयातर्फे शिवाजी पार्कच्या बाहेर पुस्तकांची विक्री करण्यात येते. यामध्ये शासकीय मुद्रणालयातर्फे 58 प्रकारची पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

- Advertisement -

यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे, शाहू महाराज गौरव ग्रंथ, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास खंड, मध्ययुगीन कालखंड, मराठी शब्दकोश तीन ते सहा खंड, विश्वकोशचे खंड, कुमार विश्वकोश, बौद्ध धर्म, धम्मपद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ, महात्मा फुले समग्र वाड्:मय, अण्णा भाऊ साठे ग्रंथ, जाती व्यवस्थेचे निर्मूुलन, रायगडची जीवनकथा, छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार, महात्मा फुले गौरव ग्रंथ आदी पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या सर्व पुस्तकांवर शासकीय मुद्रणालयातर्फे 10 टक्के सवलत देण्यात आली होती. परंतु याच स्टॉलवर विक्रीसाठी ठेवलेले सरकारमान्य ‘भारतीय संविधान’ व ‘बहिष्कृत भारत’ या दोन ग्रंथांवर कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आली नव्हती. तसेच ‘भारतीय संविधाना’ची किंमतही शिवाजी पार्कमध्ये लागणार्‍या स्टॉलवरील किंमतीपेक्षा दुप्पट म्हणजे 417 रुपये इतकी आहे. अन्य स्टॉलवरील पुस्तकांच्या किमतीपेक्षा जवळपास दुप्पट किंमत असूनही त्यावर शासकीय मुद्रणालयातर्फे सवलत देण्यात येत नव्हती. विशेष म्हणजे तसा फलकही शासकीय मुद्रणालयातर्फे लावण्यात आला होता. शासकीय मुद्रणालयात छापण्यात येणार्‍या सर्व पुस्तकांवर सवलत देण्यात येत असताना ‘भारतीय संविधान’ व ‘बहिष्कृत भारत’ या ग्रंथांवर कोणतीच सवलत देण्यात येत नसल्याबद्दल आंबेडकरी अनुयायांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.

शिवाजी पार्कमधील स्टॉलवर 250 रुपयांपासून ‘भारतीय संविधान’ मिळत असताना सरकारी स्टॉलवर त्याची दुप्पटीने विक्री होत आहे. तसेच त्यावर सवलतही देण्यात येत नाही. हा प्रकार म्हणजे सरकारने ‘भारतीय संविधान’ गरीबांपर्यंत न पोहचण्याची एकप्रकारे केलेली सोय असल्याचा आरोप आंबेडकर अनुयायी राकेश मोहिते यांनी केला. शिवाजी पार्कमधील सर्व स्टॉलमध्ये ‘भारतीय संविधाना’च्या किमतीबाबत चौकशी केली. परंतु ‘भारतीय संविधाना’ची सरकारी प्रत घ्यावी यासाठी मी पार्काबाहेर शासकीय मुद्रणालयाच्या स्टॉलवर आलो. पण येथे ‘भारतीय संविधान’ तब्बल दुप्पट किमतीला विकण्यात येत आहे. तसेच त्यावर सवलत देण्यासही नकार देण्यात येत असल्याचे सिद्धार्थ गायकवाड या तरुणाने सांगितले.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून सवलत नाही
महाराष्ट्र सरकारच्या शासकीय मुद्रणालयात छापण्यात येणार्‍या सर्व पुस्तकांवर 10 टक्केे सवलत देण्यात येते. परंतु ‘भारतीय संविधान’ची प्रत ही केंद्र सरकारकडून पाठवण्यात येते. त्यावर केंद्राकडून कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात येत नसल्याने आम्ही त्यावर सवलत देत नसल्याचे शासकीय मुद्रणालयाच्या स्टॉलवर विक्रीला बसलेल्या कर्मचार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

‘आम्ही आंबेडकरवादी’ यांची स्वच्छता मोहीम
भीम अनुयायी दरवर्षी दादर चौपाटी, शिवाजी पार्क व दादर परिसर अस्वच्छ करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो, तसा व्हिडिओ सहा वर्षांपूर्वी आम्ही पाहिला. त्यामुळे चैत्यभूमी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘आम्ही आंबेडकरवादी’ या मोहिमेंतर्गत हातात झाडू व पिशव्या घेऊन रस्ते साफ करण्यास सुरुवात केली, अशी माहिती ‘आम्ही आंबेडकरवादी’चे कार्यकर्ते नितीन कोळंबेकर व विशाल गायकवाड यांनी दिली. सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यकर्ते काम करत आहेत. या संस्थेचे जवळपास एक हजारांहून अधिक कार्यकर्तेे शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात सज्ज होते. या तरुणांनी कचरा जमा करण्याबरोबरच अनुयायांना मार्गदर्शनही केले.

राजस्थानी कुटुंब घडवतेय डॉ. आंबेडकरांच्या मूर्ती
चैत्यभुमीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर जीतेंद्र राठोड या राजस्थानी तरुणाचे संपूर्ण कुटुंब डॉ. आंबेडकर व बुद्ध यांच्या मूर्ती विक्री करत होते. या कुटुंबाने तीन ते चार स्टॉल लावले होते. विशेष म्हणजे हे कुटुंब विकत असलेल्या डॉ. आंबेडकर व बुद्ध यांच्या सर्व मूर्ती त्यांनी स्वत: बनवलेल्या होत्या. दरवर्षी 6 डिसेंबर व 14 एप्रिल हे दोन दिवस जींतेंद्र व त्याचे कुटुंबीय चैत्यभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर बुद्ध व डॉ. आंबेडकरांच्या मूर्ती विकण्यासाठी आणतात. दरवर्षी प्रत्येक स्टॉलवर 100 मूर्तींची विक्री करत होत असल्याचे जीतेंद्र यांनी सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -