मध्य रेल्वेची फुकट्यांकडून 155 कोटी रुपयांची दंड वसुली

29 लाख 85 हजार फुकटे प्रवासी

Central railway
मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर विना तिकीट प्रवास करणार्‍या फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने एप्रिल ते डिसेंबर 2019 या कालावधीत तब्बल 29 लाख 85 हजार फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाई केली आहे. तसेच या कारवाईतून तब्बल 155 कोटी 14 लाख रुपयांची दंड वसुलीही केली आहे. 2018च्या तुलनेत फुकटे प्रवासी वाढल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी फुकट्या प्रवाशांविरोधात सातत्याने मोहीम राबविली जात आहे. एप्रिल ते डिसेंबर 2019 या कालावधीत विना तिकीट, अनियमित प्रवास आणि बुक नसलेल्या सामानाची एकूण 29 लाख 89 हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 2018मध्ये याच कालावधीत 27 लाख 5 हजार फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली होती. 2018च्या तुलनेत 2019मध्ये फुकट्या प्रवाशांमध्ये साडेदहा टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

या कारवाईतून 2018 मध्ये प्रशासनाने 135 कोटी 56 लाख रुपयांची दंड वसुली केली होती. 2019 मध्ये त्यात 14.44 टक्क्यांनी वाढ झाली असून 155 कोटी 14 लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. याशिवाय मध्य रेल्वेने डिसेंबर 2019 मध्ये आरक्षित प्रवासाच्या तिकिटांच्या हस्तांतरणाची 249 प्रकरणांत कारवाई केली आहे. तसेच या कारवाईतून 1 लाख 95 हजार रुपयांची वसुली केली आहे. तरी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.