घरमुंबईसीईटीच्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर बिघाडाचे ग्रहण

सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेला सर्व्हर बिघाडाचे ग्रहण

Subscribe

सलग चार दिवस कार्यालयाबाहेर रांगा

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, अर्किटेक्चर यांच्या सीईटीच्या परीक्षा झाल्यानंतर विलंबाने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी तिला सर्व्हर बिघाडाचे ‘ग्रहण’ लागल्याचे दिसून येत आहे. 17 जूनपासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला पहिल्या दोन दिवसांतच सर्व्हर बिघाडाचे ग्रहण लागून प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच प्रवेश प्रक्रियेची मुदत संपत आल्याने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होणार नसल्याचे लक्षात आल्याने सीईटी सेलने मुदतवाढ मिळण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे.

प्रवेश नियमावलीला विलंब झाल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्या होत्या. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत विद्यार्थी व पालकांकडून सीईटी सेलकडे वारंवार विचारणा होत होती. अखेर तंत्रशिक्षण संचालनालयाने पात्रतेचे निकष आणि नियमावली सीईटी सेलला सादर केल्यानंतर प्रवेश नियामक प्राधिकरणाची तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास 17 जूनपासून सुरुवात करण्यात आली. प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास सुरुवात होताच लाखोच्या संख्येने ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम संकेतस्थळावर झाला.

- Advertisement -

प्रवेशाची लिंक सेतू केंद्राशी जोडलेली असल्याने प्रमाणपत्र तपासण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. तसेच धीम्या गतीने सर्व्हर चालू असल्याच्या तक्रारी सलग दोन दिवस पालक व विद्यार्थ्यांकडून येऊ लागल्या. मुंबईतील कीर्ति कॉलेजजवळ असलेल्या सीईटीच्या सेतू केंद्रावर विद्यार्थी अर्ज करण्यासाठी गेले असता त्यांना सर्व्हर डाऊनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यावेळी विद्यार्थ्यांना टोकन क्रमांक देऊन दुसर्‍या दिवशी बोलवण्यात आले. मात्र दुसर्‍या दिवशीही सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना टोकन घेऊनही काहीच फायदा होत नव्हता. सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणींमुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बुधवार व गुरुवार सलग दोन दिवस सीईटी सेलच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या होत्या.

राज्यातील विद्यार्थी संख्या लक्षात घेता प्रवेश प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार एमबीए, अभियांत्रिकीचे प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी ३० जूनपर्यंत तर एमबीबीएस, बीडीएस यांच्या प्रवेश प्रक्रियेची फेरी ५ जुलैपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आणि प्रवेश उशिरा सुरू झाल्याने ही ४ जुलै मुदतवाढ द्यावी अशी विनंती सरकारला सीईटी सेल आणि प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे तशी मागणी सरकारलाही न्यायालयास विनंती करावी लागणार आहे.

- Advertisement -

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राबवण्यात येणारी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया यावेळी प्रथमच सीईटी सेलकडून राबवण्यात येत आहे. पहिलेच वर्ष आणि अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्मचारी वाढवण्याची मागणी केल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -