घरमुंबईमहापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सज्ज

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सज्ज

Subscribe

सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध चैत्यभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणार्‍या आंबेडकरी जनतेच्या सुविधेसाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तात्पूरता निवारा, पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरते शौचालय आदी सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयाची चैत्यभूमीवर येत असतात. दरवर्षी त्यांच्यासाठी पालिकेकडून विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात.

देशभरातून येणार्‍या अनुयायींना आपत्कालीन परिस्थितीत तात्पूरत्या स्वरूपात निवार्‍याची सोय म्हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्या ७ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व नागरी सेवासुविधा पुरवण्यात येणार असून सुमारे १० हजार अनुयायींची त्यात व्यवस्था होऊ शकते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या सोईसाठी महापालिकेने चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०१८ रोजी महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत शासकीय मानवंदनेची प्रथा सुरु झाली. शासनाच्यावतीने चैत्यभूमी स्मारकावर प्रतिवर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येते, अशी माहिती समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली.

बेस्टच्या अतिरिक्त 60 ते 70 बसगाड्या

बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागामार्फत महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानक ते शिवाजी पार्क दरम्यान 4 ते 6 डिसेंबर या कालावधीत बेस्टची 24 तास सेवा सुरू राहणार आहे. यासाठी बेस्ट अतिरिक्त 60 ते 70 बसेस चालवणार आहे. चैत्यभूमी, शिवजीपार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज आदी ठिकाणी 301 अतिरिक्त मार्गावर प्रकाश दिवे बसविण्यात येणार आहे.

- Advertisement -

बेस्टकडून मुंबई दर्शन सेवा

4 डिसेंबरपासून शिवाजी पार्क मैदान, नानी पार्कजवळ तात्पूरत्या वीज पुरवठ्यासाठी एक खिडकी योजना उभारण्यात येईल. शिवाजी पार्क येथे भेट देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींना मुंबई शहराच्या विविध भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील स्मृतीस्थळे, वास्तूंना भेट देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई दर्शन सेवा आयोजित केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या अनुभवावरून आपत्कालीन परिस्थितीसाठी बेस्टच्या 10 गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवाजी पार्क बसचौकी येथे प्रवासी माहिती केंद्र उभारण्यात येईल. तसेच दैनंदिन बसपासचीही सुविधा उपलब्ध असणार आहे. अनुयायींना मोफत वैद्यकीय उपचार, नेत्र तपासणी आणि गरजूंना चष्मे वाटप करण्यात येईल. कॅन्सर पेशन्ट्स ऐड असोसिएशन आणि मलेरिया रिदम फाऊंडेशनच्या माध्यमातून तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व संभाव्य धोक्याविषयी जनजागृती करण्यात येईल. याव्यतिरिक्त अल्पोपहार व पिण्याची व्यवस्था बेस्ट व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे.

१ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येते. यावर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बुधवार, ५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत माहिती कक्ष, शिवाजी पार्क मैदान, दादर (पश्चिम) येथे होणार आहे.

मध्य रेल्वेकडून १४ विशेष गाड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मध्य आणि पश्चिम कोकण रेल्वे अनुयायींसाठी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने ६ डिसेंबर २०१८ रोजी नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान १४ अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वे सीएसएमटी, दादर ते नागपूरसाठी ६ गाड्या, तर अजनी ते सीएसएमटीसाठी १ आणि सोलापूर ते सीएसएमटीसाठी २ आणि अदिलाबाद -दादर २ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथील चैत्यभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पोलिसांनी सी.सी.टी.व्ही, दूरचित्रवाणी, फिरते कॅमेरे, डॉग स्कॉड, पोलीस नियंत्रण कक्षाची उभारणी केली आहे. सोबतच पोलीस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून टेहळणी मनोरा उभारण्यात आला आहे. चैत्यभूमीवर होणार्‍या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी तसेच सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांतर्फे कडक तपासणी करण्यात येत आहे. गर्दीचे योग्य ते नियोजन करण्यासाठी त्या दिवशी कसा बंदोबस्त तैनात करावा, याबाबत सध्या पोलिसांची आखणी सुरु आहे, लवकरच त्याची माहिती देण्यात येईल.
– मंजूनाथ सिंगे, प्रवक्ता, मुंबई पोलीस.

अशी असेल व्यवस्था
* चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था.
* चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा.
* १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पूरता निवारा.
* शिवाजी पार्क मैदान व परिसरात १८ फिरती शौचालये (१८० शौचकुपे).
* रांगेत असणार्‍या अनुयायींसाठी ४ फिरती शौचालये (४० शौचकुपे).
* ३८० पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था.
* पिण्याच्या पाण्याचे १६ टँकर्स.
* रांगेतील अनुयायांसाठी तात्पूरते छत
* मोबाईल चार्जिंग शिवाजी पार्कमध्ये ३०० पॉईंट
* राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
* स्काऊट गाईड हॉल येथे भिक्कू निवासाची व्यवस्था.
* अग्निशमन दलाची व्यवस्था करण्यात आली आहे.
* चौपाटीवर सुरक्षारक्षकासहित बोटीची व्यवस्था.
* कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -