घरCORONA UPDATEचाकरमान्यांना मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भरवसा नाय, गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची धडपड सुरूच

चाकरमान्यांना मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भरवसा नाय, गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची धडपड सुरूच

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेशी साधलेल्या संवादामध्ये मुंबईतून कळत-नकळत कोरोना घेऊन कोकणात जाऊ नका, असे आवाहन सर्व चाकरमान्यांना केले होते.

राज्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आता तर हे प्रमाण अधिकच वाढत आहे. मुंबईमध्ये तर मागील दोन दिवसात दररोज हजारच्यावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने मुंबईकरांची चिंता आणखीनच वाढलेली आहे. याच वाढत्या आकड्यांमुळे मुंबईत राहणारे चाकरमानी पुरते घाबरले असून, गावी जाण्यासाठी हे चाकरमानी धपडप करत आहेत. याचमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेशी साधलेल्या संवादामध्ये मुंबईतून कळत-नकळत कोरोना घेऊन कोकणात जाऊ नका, असे आवाहन सर्व चाकरमान्यांना केले होते. मात्र तरी देखील चाकरमान्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली असून, अनेकांनी मंगळवारी देखील कोकणाच्या दिशेने वाट पकडली. तर मुंबईत असणारे सध्या गावी जाण्यासाठी ऑनलाइन पास किंवा ऑफलाईन पास मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. मंगळवारी मुंबईतील विविध पोलीस स्टेशन बाहेर गावी जाण्यासाठीच्या अर्जाची विचारपूस करण्यासाठी आणि गावी जाण्याचा अर्ज भरून तो पोलीस स्टेशनला जमा करण्यासाठी उत्तर भारतीयांसह कोकणात आणि राज्यातील इतर भागात जाणाऱ्या लोकांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे.

चाकरमान्यांना सरकारवर भरवसा नाय 

दरम्यान मुंबईतील काही चाकरमान्यांशी खासगीत बोलले असता त्यांनी आम्हाला ना आता केंद्र सरकारवर भरवसा राहिला आहे ना राज्य सरकारवर असे सांगितले. मागील दोन महिने लॉकडाऊनवर लॉकडाऊन वाढत आहे. पण मुंबईतील आकडेवारी मात्र काही कमी होताना दिसत नाही. उलट आमच्या आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. एकतर आम्ही आधीच झोपडपट्टीमध्ये राहतो त्यात जर आम्हाला कोरोना झाला तर आम्ही करायचे काय?त्यापेक्षा आम्ही आमच्या गावी गेलो तर आम्ही किमान सुखी तरी राहू असे हे चाकरमानी खासगीत सांगत आहेत. विशेष म्हणजे अनेक जण लॉकडाऊनच्या काळात घरीच असल्याने आता काही जणांच्या कंपन्यांनी पगार कपात करायला देखील सुरुवात केली आहे. मुंबईत प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात. जर पगारच यापुढे आले नाहीत तर आम्ही पैसे आणायचे तरी कुठून? आम्ही निदान आमच्या गावी गेलो तर पेज भात खाऊन तरी दिवस काढू शकतो असे देखील काही चाकरमान्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

२० रुपयाला मिळतो अर्ज

सध्या मुंबईतील पोलीस स्टेशन बाहेर असलेल्या झेरॉक्सच्या दुकानात महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये जाण्यासाठी अर्ज मिळत असून, हा अर्ज २० रुपयांमध्ये विकला जात आहे. या अर्जामध्ये तुमचे नाव, किती व्यक्तींना जायचे आहे, तुमचे स्वतःचे वाहन असेल तर लायसन्स नंबर आणि जर खासगी वाहन घेऊन गावी जात असाल तर तर ड्रायव्हरचे नाव, गाडी क्रमांक आणि लायसन्स तसेच जाणाऱ्या व्यक्तींचे आधार कार्ड, मुंबईतील पत्ता, तसेच गावचा पत्ता द्यावे लागत असून, हा सर्व अर्ज नजीकच्या पोलीस स्टेशनला जमा करावा लागत आहे. त्यानंतर तुमचा अर्ज तुमच्या संबंधित जिल्ह्यात स्कॅन करून पाठवून त्यानंतर परवानगी दिली जात आहे. ही इतकी प्रक्रिया असताना देखील चाकरमानी आपल्याला गावी जायला मिळेल या अपेक्षेने अर्ज पोलीस स्टेशनला जमा करत आहेत.

खासगी वाहनांची देखील भाडी महागली

सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोकणात जाणाऱ्या लक्झरीचे भाडे देखील महाग झाले असून, सध्या लक्झरीमध्ये ३० सीट्स घेतल्या जात असून, प्रत्येकी २५०० ते ३ हजार रुपये घेतले जात आहेत. मात्र सध्या मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता चाकरमानी या भाडेवाढीचा विचार न करतात आपल्याला कधी आपले गाव गाठता येईल याचा विचार करत आहेत.

- Advertisement -

मी झोपडपट्टीमध्ये राहतो. आमच्या आजूबाजूच्या झोपडपट्ट्यामध्ये देखील आता कोरोना रुग्ण सापडत आहेत. आजूबाजूला रुग्ण सापडत असल्याने ही परिस्थिती भयानक होण्याआधी मायबाप सरकारने आम्हाला गावी जाऊ द्यावे. आम्ही आमच्या गावी स्वखर्चाने जाऊ फक्त आम्हाला गावी जाण्याची परवानगी लवकर द्यावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -