घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टकल्याणच्या मैदानात शिवसेनेसमोर कुणाचे आव्हान?

कल्याणच्या मैदानात शिवसेनेसमोर कुणाचे आव्हान?

Subscribe

कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेली दोन टर्म प्रयत्न सुरू आहेत. 2014 च्या निवडणुकीत सेनेच्या विद्यमान खासदाराला गळाला लावूनही राष्ट्रवादीचे सेनेचा हा बालेकिल्ला काबीज करण्याचे स्वप्नभंग पावले. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँगेस तगडा उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहे. एकिकडे राष्ट्रवादीकडून गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड या दोन तगड्या उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच, दुसरीकडे मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचीही राष्ट्रवादीची खेळी सुरू आहे. त्यामुळे कल्याणच्या मैदानात शिंदेसमोर कुणाचे आव्हान उभे राहते याकडे लक्ष वेधले आहे.

कल्याण लोकसभा हा बहुभाषिक, सरमिसळ असलेला मतदारसंघ म्हणूनच ओळखला जातो. या भागात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण -डोंबिवलीसह अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा मुंब्रा, दिवा हा परिसर जोडला गेला आहे. कल्याण-डोंबिवलीची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. कळवा-मुंब्रा-दिवा या परिसरात बहुभाषिक समाज मोठ्या प्रमाणात आहे. ठाणे महापालिकेचा भाग, कल्याण – डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद तसेच कल्याण ग्रामीण हा ठाणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणारा भाग अशी सरमिसळ होऊन कल्याण लोकसभा मतदारसंघ बनला आहे. शहरी, ग्रामीण तर काही भागात झोपडपट्टी असे इथले संमिश्र चित्र आहे. बहुसंख्य मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाज हे या भागाचे वैशिष्ठ्य आहे. या मतदार संघात ब्राह्मण, आगरी आणि मुस्लीम समाजातील मतदारांची एकगठ्ठा मते आहेत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची ताकद आहे. तर कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपचे वर्चस्व आहे. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार ज्योती कलानी आहेत. मात्र त्यांची सून उल्हासनगर महापालिकेत भाजपची महापौर आहे. त्यामुळे ज्येाती कलानी राष्ट्रवादीला साथ देतील की नाही हे सुध्दा महत्वाचे आहे.

- Advertisement -

2009 ला आनंद परांजपे कल्याणमधून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. 2014 च्या निवडणुकीत सेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी घेतल्याने, शिवसेनेने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. मनसेनेही प्रमोद उर्फ राजू पाटील या तुल्यबळ उमेदवाराला रिंगणात उतरवले होते. या अटीतटीच्या लढाईत डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीसाठी खासदार शिंदे पुन्हा सज्ज झाले आहेत. माजी खासदार आनंद परांजपे हे ठाण्यात सक्रीय आहेत. त्यामुळे कल्याणातून पुन्हा निवडणूक लढण्यास ते इच्छूक नाहीत. लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. पण ते त्यांच्या मतदार संघ सोडून बाहेर फारसे सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे हे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे आव्हाड हे श्रीकांत शिंदेसमोर उभे राहतील का ? याबाबत साशंकता आहे.

राष्ट्रवादीचे गणेश नाईक हे कल्याणमधून निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याने त्यांना ठाण्यात उतरविण्याचा पक्षाचा विचार सुरू आहे. त्यामुळे आव्हाड- नाईक यांनी कल्याणमधून लढण्यास नकार दर्शविल्यास राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार दिसून येत नाही, त्यामुळेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेबरोबरच युती करण्यासाठी हात पुढे केला आहे. कल्याणची जागा मनसेला सोडण्यास राष्ट्रवादी तयार आहे. मात्र अजूनही त्यावर शिक्कमोर्तब झालेले नाही. मनसेकडे राजू पाटील सारखा तगडा उमेदवार आहे. त्यामुळे मनसेच्या इंजिनाने राष्ट्रवादीची वेळ साधली तर कल्याणचा सामना अटीतटीचा होणार हे नक्कीच.

- Advertisement -

2014 ची आकडेवारी
शिवसेना – डॉ. श्रीकांत शिंदे – 4 लाख 40 हजार 892
राष्ट्रवादी काँग्रेस – आनंद परांजपे – 1 लाख 90 हजार 143
मनसे – राजू पाटील – 1 लाख 22 हजार 349
आप – नरेश ठाकूर – 20 हजार 347
बसपा – दयानंद किरतकर – 19 हजार 643
नोटा – 9 हजार 815

विधानसभा मतदारसंघ
अंबरनाथ – बालाजी किणीकर – शिवसेना
उल्हासनगर – ज्योती कलानी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कल्याण (पूर्व) – गणपत गायकवाड – अपक्ष
डोंबिवली – रविंद्र चव्हाण – भाजप
कल्याण (ग्रामीण) – सुभाष भोईर – शिवसेना
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

मतदारसंघातील न सुटलेले प्रश्न
वालधुनी नदीची समस्या, 27 गावांचा स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा, नेवाळी जमिनीचा प्रश्न, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, घनकचर्‍याची समस्या, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचे प्रश्न.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -