ठाण्यात शिवसेनेला असंतुष्टांची डोकेदुखी

आऊटगोइंग रोखण्याचे आव्हान

Mumbai
Shivsena
शिवसेना

बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या भक्कम तटबंदीला भेदण्यासाठी कृष्णकुंजवरून साखरपेरणी सुरू झाल्याने जिल्ह्यातील सेना नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे सेनेत एकीकडे अन्य पक्षांतून इनकमिंग सुरू असताना स्वतःच्या पक्षातून आउटगोईंग सुरू होऊ नये यासाठी सेनेने कंबर कसली आहे.

ठाणे जिल्हा हा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. जिल्ह्यातील शिवसेनेची सारी मदार ही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेत आणण्याचे डावपेच हे पालकमंत्र्यांचेच होते. विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती जवळपास निश्चित असल्याने सेनेला भाजपच्या वाट्याला जाणार्‍या मतदारसंघात स्वपक्षातील इच्छुकांची मोठी नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे.

त्यामध्ये ठाणे शहर, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. या तीनही मतदारसंघात आजमितीला भाजपचे आमदार निवडून आले आहेत. कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड हे जरी अपक्ष निवडून आले असले तरी ते भाजपच्या बरोबर असतात. यामुळे कल्याण पूर्वही युतीच्या जागावाटपात भाजपकडे जाणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे निवणुकीला उभे होते. थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. माजी महापौर रमेश जाधव, तसेच उल्हासनगरचे ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे हे देखील कल्याण पूर्वमधून सेनेतून आमदारकीला इच्छुक समजले जातात.

कल्याण पश्चिमेतही तीच स्थिती आहे. कल्याण पश्चिम हा पूर्णतः शहरी मतदारसंघ असून महापालिकेचे 35 प्रभाग या मतदारसंघात येतात. त्यापैकी 23 प्रभागांमधून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ स्वतःकडे असावा, अशी सेनेतील एका गटाची भावना आहे. मात्र, येथे मागील वेळेस भाजपचे नरेंद्र पवार हे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत विजयी मतदारसंघ सेनेला सोडणार नाही. त्यामुळे या मतदारसंघातील इच्छुकांच्या मनसुब्यांवर आताच पाणी फिरले आहे.

ठाणे शहर मतदारसंघ हा तर आमदार मो.दा.जोशींपासून वर्षांनुवर्षे सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत सेनेला हा मतदारसंघ राखता आला नाही आणि सेनेच्या किल्ल्यातच भाजपचे कमळ फुलले. मागे शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर सेनेतील मातब्बर मंडळी या मतदारसंघात कामाला लागली होती. शिवसेनेचे ठाणे लोकसभा जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के या मतदारसंघातून उभे राहण्यासाठी तयारीला लागले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपशी पुन्हा युती झाली आणि लोकसभेबरोबरच विधानसभेतही युती निश्चित झाल्याने इच्छुकांची नाराजी आता सेनेला अंगावर घ्यावी लागणार आहे. शिवसेनेतील या घडामोडींकडे सध्या कृष्णकुंजचे बारीक लक्ष आहे. शहापुरातही पांडुरंग बरोरांच्या सेनाप्रवेशाने सेनेतील एक मोठा गट नाराज झाला आहे. त्यामुळे सेनेतील नाराजांपैकी कोण गळाला लागतेय का? याची चाचपणी मनसेकडून सुरू आहे.

नाराजी कशी दूर करणार?
2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून तर डोंबिवलीतील ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवत अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यांसह मातोश्रीवरून सूत्रे हलल्यामुळे तरे व म्हात्रेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. यावेळी मात्र इच्छुकांची नाराशी कशी दूर करायची? याची मोठी डोकेदुखी सेना नेत्यांना भेडसावण्याची चिन्हे आहेत.