येत्या दोन दिवसात राज्यातील या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Mumbai
Heavy rain in ratnagiri expected till 2nd august
प्रातिनिधिक छायाचित्र

बंगालच्या उपसागरात कमा दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यातील विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. उद्या ७ ऑगस्ट आणि परवा ८ ऑगस्ट रोजी या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येसुद्धा येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.


हेही वाचा – दोन दिवसांनी बदलापूर, कर्जत मार्ग सुरळीत


नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार ७ ऑगस्ट रोजी पूर्व-विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. तर उर्वरित विदर्भात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ८ ऑगस्ट रोजी विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या दोन दिवसांनंतर ९ ऑगस्टपासून विदर्भात तर १० ऑगस्टपासून मध्य-महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती सामान्य राहील, असेही हवामान तज्ज्ञ सांगतात. पण ७ आणि ८ ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने या काळात विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुले या काळात या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.