पंकजा मुंडे भाजपमध्येच होत्या, आहेत आणि पुढेही राहणार; पाटील यांची प्रतिक्रिया

Mumbai
chandrakant patil
चंद्रकांत पाटील

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजप हे नाव काढून टाकल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणारा का?, अशा चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सोमवारी सकाळी नाशिक येथील पत्रकार परिषदेत पंकजा मुंडेच नव्हे तर अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे या चर्चा आणखीनच रंगू लागल्या. यावर भाजपचे नेता चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या अफवा असल्याचे म्हटले आहे. पंकजा मुंडे कालही भाजपमध्ये होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहणार, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील 

पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून भाजप नाव डिलीट केल्यामुळे विविध चर्चा रंगू लागल्या आहे. त्या इतर पक्षामध्ये जात असल्याच्या अफवा समोर येऊ लागल्या आहे. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पाटील यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांचे वडिल स्व. गोपीनाथ मुंडे यांचे भाजपमधील योगदान मोठे आहे. पंकजा यांनी त्यांच्या कार्याला उभारी दिली आहे. विशेष म्हणजे आमचे त्यांच्याशी बोलणे झाले असून पक्षांतराच्या केवळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण पाटील यांनी यावेळी दिले. तसेच मुंडे आणि महाजन परिवाराचे ठाकरे कुटुंबाशी जुने ऋणानुबंध आहेत. तसेच १२ डिसेंबर रोजी भाजपचे सर्व नेते गोपीनाथ गडावर जातात. एकदा अमित शहादेखील गोपीनाथ गडावर गेले होते. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत. यावर आम्हाला विश्वास आहे.

पंकजा यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान काल पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट केली होती. यामध्ये १२ डिसेंबर रोजी गोपीनाथगडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी राज्याच्या राजकारणात आणखी एक घडोमोड घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.