घरमुंबईउद्धव म्हणतात, 'आमचं ठरलंय', पण चंद्रकांतदादा म्हणतात, 'कुठं ठरलंय'?

उद्धव म्हणतात, ‘आमचं ठरलंय’, पण चंद्रकांतदादा म्हणतात, ‘कुठं ठरलंय’?

Subscribe

शिवसेना-भाजपमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी नक्की कोणत्या फॉर्म्युल्यानुसार युती झाली आहे? याविषयी नवीन संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

एकीकडे मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलं असता प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरे ‘आम्ही बघून घेऊ, आमचं ठरलंय’, असं सांगत असतानाच भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतायत ‘जागा वाटपांचा कुठं ठरलंय’? त्यामुळे नक्की युतीमध्ये चाललंय काय? असा प्रश्न आता सगळे विचारू लागले आहेत. लोकसभा निवडणुका होईपर्यंत युतीमध्ये सारंकाही हसत खेळत सुरू असताना आता विधानसभा निवडणुका आणि मुख्यमंत्रीपदाबाबत युतीमध्ये गोंधळ सुरू झाल्याचं देखील बोललं जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यात भरच पडली आहे!

समसमान वाटप म्हणजे नक्की किती?

केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे रावसाहेब दानवेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि त्या जागी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आता चंद्रकांत पाटील पक्षाचं धोरण ठरवणार असल्यामुळे त्यांच्या विधानांना आपोआपच युतीच्या संदर्भात राजकीय वजन प्राप्त झालं आहे. त्यातच ‘युतीचा नक्की फॉर्म्युला अजून ठरलेलाच नाही. विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचं समसमान वाटप होईल, या तत्वावर युती करण्यात आली होती’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता याचा अर्थ नक्की फॉर्म्युला ठरला आहे, ठरलेला नाही, मित्रपक्षांच्या जागा ठरल्या आहेत की नाही आणि उरलेल्या जागा किती आणि त्याचं समसमान वाटप म्हणजे किती? असे प्रश्न मात्र उपस्थित होऊ लागले आहेत.

- Advertisement -

वाचा उद्धव ठाकरे काय म्हणाले – ‘आमचं ठरलंय; त्यात कोणी तोंड घालू नये’

५०-५०च्या फॉर्म्युल्याचं काय झालं?

एकीकडे समसमान जागावाटपाबद्दल बोलतानाच दुसरीकडे ‘याआधीच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडल्या जाणार नाहीत’, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे नक्की किती जागांवर समझोता होणार? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. याआधी युतीमध्ये ५०-५०चा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं गेलं. शिवाय मुख्यंमत्रीपद भाजप आणि शिवसेनेमध्ये अडीच अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याविषयी देखील चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र, चंद्रकांत दादांच्या या नव्या वक्तव्यामुळे नवीन संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -