घरमुंबईसंपर्क तुटला, संकल्प कायम !

संपर्क तुटला, संकल्प कायम !

Subscribe

भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेकडे भारतासह अवघ्या जगाचे लक्ष लागले असताना शनिवारी पहाटे १.५५ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यास काही मिनिटांचा अवधी उरला असतानाच त्याच्याशी असलेला संपर्क तुटला आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. संपर्क तुटला तरी संकल्प कायम ठेवून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे इस्त्रोतील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरूच आहेत. चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील तब्बल 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर इतके अंतर कापून चंद्रावर उतरण्यास अवघे २.१ किमीवर असतानाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑर्बिटर आणि लँडरचा संपर्क तुटला.

अवघ्या २.१ किमी अंतरावर तुटला संपर्क

जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्त्रोच्या हाती निराशा आली. भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या तयारीत असताना ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरपर्यंत पोहोचले. तोपर्यंत त्याचा नियोजित दिशेने प्रवास सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात अडचणी निर्माण झाल्या. पर्यायी योजनेच्या माध्यमातून आकडेवारी मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ तात्काळ कामाला लागले. भारताच्या या चांद्रयान-२ मोहिमेचे विदेशातील वृत्तपत्रांनीही कौतुक केले. तसेच चांद्रयान-2 चे ऑर्बिटर अगदी योग्य ठिकाणी असून ते चंद्राच्या कक्षेत योग्य पद्धतीने भ्रमण करत होते. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल, अशी भावना शास्त्रज्ञांच्या मनात होती.

- Advertisement -

इस्त्रोचे प्रमुख सिवन यांचे सांत्वन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणानंतर इस्त्रोमधील उपस्थित प्रत्येक शास्त्रज्ञांची भेट घेत हात मिळवला. तसेच ‘तुमच्या सारखे ज्येष्ठ लोक इथे असल्याने याचा मोठा फायदा होतो’, असे म्हणाले. यावेळी इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या. ते त्यांचे दु:ख लपवू शकले नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांना मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिवन यांचे सांत्वन केले.

विज्ञानात अपयश नसते, असतो तो केवळ प्रयोग
चांद्रयान-२ च्या संपूर्ण प्रवासादरम्यान देशवासीय अनेकदा आनंदीत झाले. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण करून देतात. ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक जर कुणी असेल तर तो आहे विज्ञान. विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग आणि प्रयत्न असतो. कधीही हार न मानणार्‍या आपल्या संस्कृतीचे इस्रोने जतन केले आहे. मी कालही म्हटले होते आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देशदेखील आपल्यासोबत आहे. तुम्हा सर्वांना पुढील सर्व मोहिमांसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या सेंटरमधून शास्त्रज्ञांना धीर दिला, तसेच देशवासियांना संबोधित केले.

- Advertisement -

पुढील १४ दिवस विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न                                                                          विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला असला तरी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास तुटला नाही. इस्रोकडून विक्रमसोबत पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत,अशी माहिती इस्रो प्रमुख के. सिवन यांनी दिली. आगामी १४ दिवस विक्रमशी संपर्क साधण्यात येणार असल्याचेहे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

विक्रमसोबत पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चांद्रयान-२ मोहीम जवळपास ९५ टक्के यशस्वी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रयान-२ चा ऑर्बिटर जवळपास ७.५ वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतो. त्याशिवाय गगनयानसह इस्रोच्या अन्य अंतराळ मोहिमादेखील वेळेतच पूर्ण होणार असल्याची माहिती सिवन यांनी दिली.

इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी देखील चांद्रयान-२ मोहीम ९५ टक्के यशस्वी झाले असल्याचे म्हटले आहे. ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत असून त्याच्याकडून अधिक चांगले छायाचित्र मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. नासाचे शास्त्रज्ञ जेरी लिनेंगरनेदेखील भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -