Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी लोकलने बिघडवले कोविड योद्ध्यांचे वेळापत्रक…

लोकलने बिघडवले कोविड योद्ध्यांचे वेळापत्रक…

लोकलच्या वेळापत्रकात बदल केल्याने वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. .

Mumbai
mumbai local

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती. परंतु, अत्यावश्यक सेवा देणार्‍या हॉस्पिटल कर्मचार्‍यांसाठी बेस्ट आणि एसटीकडून बसेस सेवा पुरविल्या जात होत्या. मात्र, आता १५ जूनपासून सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचार्‍यांची तीन पाळीमध्ये नोकरी असल्याने त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा उपलब्ध नाही. तसेच 1 जुलैपासून काही लोकलच्या वेळापत्रकात बदल केल्याने आज वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा सुरू करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

रेल्वे प्रशासनास दिले पत्र

पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू, वानगाव, बोईसर, उमरोली, पालघर, सफाळे,वैतरणा येथून बोरिवली, अंधेरी येथील शताब्दी रुग्णालय, भगवती हॉस्पिटल बोरिवली, ओशिवरा कूपर, नायर, केईएम सायन अशा अनेक रुग्णालयातील ३०० डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, अशा अत्यावश्यक सेवांसाठी दररोज प्रवास करीत असतात. मात्र, त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची गैरसोय होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा सुरू करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. त्यासंबंधित पत्र सुद्धा पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोडवरून चर्चगेट दिशेकडे जाण्यासाठी पहाटे ५, सकाळी ११.३० आणि सायंकाळी ६.१० वाजता लोकल सोडण्यात यावी. तर परतीचा प्रवास करण्यासाठी बोरिवलीवरून सकाळी ७.३८, दुपारी २.३० आणि रात्री ९.१० वाजता डहाणूसाठी लोकल सेवा असावी अशी मागणी वैद्यकीय कर्मचार्‍यांनी केली आहे. त्यासंबंधित पत्र सुद्धा पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहे.

नवीन वेळापत्रक रद्द करावे

बोरिवलीच्या सावित्रीबाई फुले सर्वसाधारण रुग्णालयच्या नर्स सोनाली घरत यांनी ‘दैनिक आपलं महानगर’शी बोलताना सांगितले की, सकाळची शिफ्टची वेळ सात वाजताची असते. त्यामुळे आम्हाला वेळेत पोहचण्यासाठी पहाटे ५ वाजताची विरार- डहाणू लोकल होती. त्यामुळे आम्ही वेळेवर कर्तव्यावर पोहचत होतो. मात्र, पश्चिम रेल्वेने १ जुलैपासून नवीन वेळापत्रक लागू केले आहे. त्यामुळे पहाटे ५ वाजताची लोकलही ५ वाजून ४० मिनिटांनी सुटायला लागली. त्यामुळे रुग्णालयात पोहोचताना उशीर होत आहे. आता रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरी सुरू झाल्यामुळे आम्हाला पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने विरार- डहाणू लोकल जुन्या वेळेनुसार सोडावीत अशी मागणी पश्चिम रेल्वे प्रशासनाला केली आहे.

डॉक्टर आणि नर्सेसची गैरसोय

कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिसरात मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल्स आहेत. या हॉस्पिटल्समध्ये काम करणारे बरेच कर्मचारी नालासोपारा, विरार, बोरिवली आणि वसईमध्ये राहणारे आहेत. या हॉस्पिटल्समध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालत असते. प्रत्येक शिफ्टमध्ये 60 ते 70 नर्सेस कार्यरत असतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी बेस्ट आणि एसटीचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे या तिन्ही शिफ्टमधल्या कर्मचार्‍यांचा खोळंबा होत आहे. शिप्टनुसार लोकल सेवा नसल्याने तासंतास रेल्वे स्थानकांवर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे डॉक्टर आणि नर्सेसची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

शासनाने सुविधा पुरवावी

‘कोविड नोकरी असून पहाटे ५ ची डहाणू- विरार लोकलचे वेळापत्रक बदलल्यामुळे आम्हाला हॉस्पिटलमध्ये दीड तास उशीर होतो आहे. तसेच रात्रीसाठी लोकल सेवा नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. आम्ही कोविड ड्युटीवर असल्यामुळे आम्हाला पूर्वी हॉटेलची सुविधा दिली होती. त्यामुळे रात्री साधन जरी भेटले नाही तर आम्ही हॉटेलमध्ये थांबू शकत होतो. मात्र, हॉटेल सुद्धा आम्हाला खाली करायला लावले आहे. त्यामुळे आता हॉटेल सुद्धा नाही. वेळेवर लोकल सेवा पण नाही. रात्री उशिरा घरी पोहोचण्यासाठी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते, आम्ही कोविड ड्युटीवर असताना शासनाने सुविधा पुरवायला पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल कांदिवलीच्या नर्स प्रियदर्शनी पाचोळे यांनी दिली आहे.