घरमुंबईविद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी हवी ऑनलाईन गुणपत्रिका तपासणी

विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी हवी ऑनलाईन गुणपत्रिका तपासणी

Subscribe

युवा सेनेची मुंबई विद्यापीठात धाव

परदेशात नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना पदवी गुणपत्रिकेची तपासणी करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया ऑफलाईन असल्याने गुणपत्रिका तपासणीसाठी महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार विद्यापीठाकडे चकरा माराव्या लागतात. त्यातच विद्यार्थी बाहेरगावी स्थायिक असल्यास त्याची प्रचंड गैरसोय होते. विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी विद्यापीठाने गुणपत्रिकांची तपासणी ऑनलाईन करावी, अशी मागणी युवा सेनेने मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

जागतिक धोरणानुसार कोणत्याही देशाच्या विद्यार्थ्यास उच्च शिक्षण व नोकरीसाठी आपली पदवी तपासणी म्हणजेच ट्रान्सस्क्रिप्ट करून घेणे महत्त्वाचे असते. गुणपत्रिका तपासणीचे प्रमुख काम वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेस ही जागतिक संस्था करते. मुंबई विद्यापीठातून गुणपत्रिका ट्रान्सक्रिप्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेस यांच्याकडे परदेशात कुरीअरमार्फत पाठवाव्या लागतात. त्यानंतर वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेस ही संस्था त्यांच्याकडे येणार्‍या पारदर्शक गुणपत्रिका पुन्हा विद्यार्थ्याच्या विद्यापीठाकडे सत्यता तपासणीसाठी पाठवतात. विद्यापीठ पुन्हा सर्व्हिसेसकडे सत्यता अहवाल देतात. या प्रक्रियेत विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेची तपासणी दोन वेळा करण्यात येते.

- Advertisement -

ही प्रक्रिया पूर्ण होण्यास 20 दिवस ते 1 महिन्याचा कालावधी लागतो. मुंबई विद्यापीठाचा पदवीधर बाहेरगावी स्थायिक झाला असल्यास त्यालाही ही प्रक्रिया करण्यासाठी विद्यापीठात यावे लागते. यामुळे विद्यार्थ्याचा प्रवास खर्च आणि बराच वेळ जातो. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने ऑनलाईन करावी, अशी मागणी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोलंबेकर यांनी प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

ऑनलाईन प्रक्रियेमुळे गुणपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुलभ, सोपी व जलदरीत्या होईल. गुणपत्रिका वर्ल्ड एज्युकेशन सर्व्हिसेसकडे ऑनलाईन पाठवल्यास तपासणी सात दिवसात होईल. तसेच तपासणीसाठी येणारा खर्च कमी होऊन विद्यार्थ्यांना परदेशातून मुंबईत येण्याची गरज भासणार नाही.
– प्रदीप सावंत, मॅनेजमेंट काऊन्सिल, युवासेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -