तब्बल ७३ वर्षांनी अखेर शिवाजी पार्कचं नाव बदललं!

महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मार्चमध्ये महासभेत या मैदानाचा नामविस्तार करण्याचा ठराव मांडला होता.

मुंबईतील दादरची ओळख असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानाचे नाव बदलण्यात आले आहे. शिवाजी पार्क मैदानाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करण्यात आले आहे. तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क या मैदानाचे नाव बदलण्यात आले आहे. या नामविस्ताराचा प्रस्ताव मार्चमध्ये महापालिका सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे नुकतंच मुंबई महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे.

माहीम पार्क अशी ओळख असणाऱ्या या उद्यानाचे १० मे १९२७ रोजी शिवाजी पार्क असे नामकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर १९६६ मध्ये या मैदानात लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मार्चमध्ये महासभेत या मैदानाचा नामविस्तार करण्याचा ठराव मांडला होता. या प्रस्तावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठरावाला मंजूरी दिली.

दादरमधील शिवाजी पार्क मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. या मैदानात अनेक राजकीय सभा पार पडतात. विशेष म्हणजे हे मैदान क्रिकेटसाठीही प्रसिद्ध आहे. या मैदानात अनेक क्रिकेटपटू घडले आहेत. अखेर आज पालिकेने शिवाजी पार्क मैदानाच्या नावाची पाटी बदलून छत्रपती शिवाजी महाराज मैदान अशी अधिकृत पाटी लावली आहे.