मुख्यमंत्री केवळ वेळ निभावून नेताहेत!

महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी दिवसेंदिवस आक्रमक होतो आहे. गेल्या दोन वर्षांत मराठा समाजातर्फे ५८ मूक मोर्चे काढण्यात आले; पण त्यातून काहीच साध्य न झाल्याने एका बाजूला हिंसा आणि दुसरीकडे मराठा तरुणांच्या आत्महत्या असे चित्र दिसते आहे. या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांच्याशी ‘आपलं महानगर’चे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांनी केलेली ही खास बातचीत.

Mumbai
virendra pawar
मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार

१. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या मागणीला महाराष्ट्रात प्रचंड वेग आला. त्यानंतर ५८ मोर्चे निघाले. एकंदरीत या सगळ्याची सुरुवात कशी होती?

-कोपर्डी अत्याचाराची घटना घडली तो दिवस होता१३ जुलै २०१६. पण याआधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन एक गोलमेज परिषद घेण्यात आली होती. या परिषदेमध्ये शशिकांत पवार म्हणजे माझे वडील, प्रविण गायकवाड आणि आमदार नितेश राणे आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते. याचदरम्यान कोपर्डीच्या घटनेबद्दल समजलं आणि मग घटनेतल्या आरोपींवर गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या आंदोलनांना सुरुवात झाली. अतिशय शांततेत निघालेल्या ५८ मोर्चांचं सर्व स्तरांतून कौतुकही झालं. पहिला मोर्चा औरंगाबादमध्ये निघाला होता.कोणत्याही राजकीय पक्षाला हाताशी न घेता केवळ महिलांना नेतृत्व देत राजकारणविरहीत आंदोलनाला आम्ही सुरुवात केली.

२. त्यादरम्यान तुम्ही वारंवार सरकारकडे निवेदने दिली होती. पण सरकारने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. नक्की काय झालं होतं?
– औरंगाबादमधून मोर्चाला सुरुवात झाली. अतिशय शांततेत आम्ही हे मोर्चे काढायला सुरुवात केली होती. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी नाही किंवा कोणता राजकीय नेता नाही अशी या मोर्चाला सुरुवात झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात चर्चेसाठी एक समिती नेमण्यात आली होती. त्यात मंत्री गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विनोद तावडे यांचाही समावेश होता.पण मराठा समाजाचे समन्वयक आणि समिती यांच्यात आतापर्यंत एकही बैठक झाली नाही. सरकारने मागण्यांना धरुन कधी गंभीर विचारच केला नाही!

३. मागास आयोगाचा अहवाल आल्यावर आरक्षणाच्या मागणीवर तातडीने विचार केला जाईल, असं सांगत सरकार आरक्षणाच्या मागणीवर आश्वासन देत आहे याबद्दल काय म्हणाल?
– आतापर्यंत सरकारने फक्त आश्वासनेच दिली आहेत. शांतताप्रिय मोर्चे आता आक्रमक झाले याला सुद्धा सरकार जबाबदार आहे. ‘आम्ही आरक्षण देऊ’असं सांगत आतापर्यंत सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली. त्यामुळेच आंदोलनांना हिंसक वळण मिळायला सुरुवात झाली.अद्यापही मुख्यमंत्री मागास आयोगाच्या अहवालाची वाट बघताहेत. ‘महिन्याभरात मागास आयोगाचा अहवाल येईल, त्यानंतर आरक्षणाच्या मागणीवर योग्य ती भूमिका घेतली जाईल’ असे सांगितले जाते. मुख्यमंत्री सध्याची वेळ निभावून नेण्यासाठी अशी आश्वासने देत आहेत. त्यांनी याआधी सुद्धा हेच केले आहे.

४. हिंसेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत आहे. याबद्दल काय म्हणाल?
– आता मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा संयम सुटला आहे. त्यामुळेचआंदोलनाला हे हिंसक वळण लागलं. मात्र आंदोलनादरम्यान हिंसा आणि तोडफोड करणारे फक्त मराठा समाजातील तरुण नसून काही समाजकंटकसुद्धा आत घुसले आहेत. शांतताप्रिय मराठा मोर्चाला बदनाम करण्याचा घाट घातला जातोय.

५. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये कुठेतरी गैरसमज होताना दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. मराठा समाजात फूट पडतेय का?
– कोपर्डीच्या घटनेनंतर ६ नोव्हेंबर २०१६ ला मुंबईत पहिली बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यात मुंबईतून जवळपास ५० हजार मराठा तरुण सहभागी झाले होते. त्यावेळी जी एकी होती ती आता दिसत नाही, हे खरंच. मराठा समाजाच्या सगळ्या समन्वयक आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत निर्णय घ्यायचा प्रयत्न मी आजवर केला. मराठा समाज एक आहे. आता मात्र दिखाऊपणे चमकण्यासाठी काहीजण पुढाकार घेत असल्याचे दिसते आहे. जेलभरो आंदोलन पुकारण्यात आलं होतं त्याची आम्हाला कल्पना होती. पण हे आंदोलन महाराष्ट्रात जिल्हानिहाय करण्यात येणार होतं. त्याप्रमाणे काही ठराविक लोक या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलन सुरु असताना जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत म्हणून आम्ही आंदोलनात सहभाग घेतला नाही.

६. आंदोलन भरकटत आहे असं दिसतंय.आत्महत्यांचं सत्र सुद्धा थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.

– मराठा आंदोलनादरम्यान तरुण करत असलेल्या आत्महत्या म्हणजे पूर्णत: चुकीचं पाऊल आहे. मराठा बांधवांना आम्ही वारंवार आवाहन केले आहे, की असे कोणतेही पाऊल उचलू नका. पण लोकांचा वाढता असंतोष असा उफाळून येतो आहे. मराठा बांधवांना आम्ही पुन्हा विनंती करतो की असं कोणतंही पाऊल उचलू नका. कारण आपली लढाई ही खंबीरपणे लढायची आहे.

७. मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? ९ ऑगस्टला पुन्हा एकदा महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका उडणार असल्याचं बोललं जात आहे याबद्दल काय सांगाल?
– मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मागास आयोगाचा अहवाल मागवला आहे. त्यानुसार मागास आयोगाचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट होईल. पण येत्या ९ ऑगस्टला महाराष्ट्रात आंदोलन होणार असून यावेळी कोणत्याही प्रकारचा दंगा होणार नाही. हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर होणार आहे. आम्ही मुंबईतसुद्धा आंदोलन करणार असून ते ठिय्या पद्धतीचे असेल. आरक्षणासाठी वाढत्या आत्महत्या आणि मराठा समाजाच्या भावना सरकारने समजून घेणे गरजेचे आहे. आता कृतीची, आणीबाणीची वेळ आलेली आहे, हे निश्चित!


– कृष्णा सोनारवाडकर