घरमुंबईभूमाफियांपुढे सिडको, महापालिका हतबल

भूमाफियांपुढे सिडको, महापालिका हतबल

Subscribe

बेकायदा बांधकामे रोखण्याचा प्रश्न

अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी सिडको व महापालिकेकडे सक्षम यंत्रणा नसल्याने आजमितीस भूमाफिया दोन्ही प्राधिकरणाच्या अक्षम यंत्रणेचा फायदा उचलत आहेत. एकीकडे कारवाई तर दुसरीकडे लगेच त्याच जागेवर बांधकाम अशी परिस्थिती झाल्याने आता सिडको आणि मनपाकडे फक्त बेकायदा बांधकामे करू नका, असे आवाहन करण्याचा पर्याय राहिला आहे. त्यानुसार नेहमीप्रमाणे कागदपत्रे नसलेल्या इमारतींमध्ये घर किंवा सदनिका खरेदी करू नका, असे आवाहन मागच्या महिन्यात नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. त्यात अनधिकृत बांधकामांची यादी पालिकेने जाहीर केली होती. याच पार्श्वभूमीवर सिडकोनेही आपल्या संपादित जागेवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर केली असून अशा इमारतींमध्ये घरे किंवा सदनिका खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र ही बेकायदा बांधकामे उभी राहत असताना संबंधित यंत्रणा कुठे होत्या? असा प्रश्नही त्यानिमित्ताने समोर आला आहे.

शहरात अनधिकृतपणे बांधण्यात येणार्‍या बांधकामांवर सिडको आणि महापालिका दोन्ही प्राधिकरणांच्या वतीने वारंवार कारवाई केली जात असली, तरी अनधिकृत बांधकामे पुन्हा उभी राहत आहेत. नवी मुंबईमध्ये आजही सिडकोने संपादित केलेल्या जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. अनेक भूखंड मोकळे आहेत. त्यामुळे ती संपादित जागा आहे की नाही, याबाबत अनेकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे अनेकांच्या वतीने अशा भूखंडावर बांधकामे केली जात आहेत. शिवाय सिडकोची परवानगी न घेता बांधकाम करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा बांधकामांनी सिडकोची डोकेदुखी वाढवली आहे. अनधिकृत बांधकामे सिडकोच्या वतीने, कायदेशीर प्रक्रिया करून वारंवार कारवाई करून पाडली जात आहेत. त्यामुळे नवी मुंबईत घरे किंवा सदनिका खरेदी करताना जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकामाला संबंधित प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली आहे का, हे पडताळूनच व्यवहार करावेत, असे आवाहन सिडकोने केले आहे. त्यानंतर होणार्‍या कायदेशीर परिणामास किंवा आर्थिक नुकसानीस सिडको जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अशा अनधिकृत बांधकामांना आणि बांधकामधारकांना 1 जून 2018 पासून फेब्रुवारी 2018 पर्यंत महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम 1966 अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. ही बांधकामे निष्कासित करण्याची कारवाईही हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अशी बांधकामे थांबवावीत, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

घणसोलीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे
सिडकोने जाहीर केलेल्या आपल्या जागेवरील अनधिकृत बांधकामांच्या यादीनुसार सर्वाधिक बांधकामे घणसोली विभागात सुरू आहेत. त्यानुसार येथे 38 बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रबाळे गोठीवली या विभागात एकूण 10 बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ऐरोली नोडमध्ये 8 बांधकामांना, दिवे विभागात 5, कोपरखैरणे नोडमध्ये 19, वाशी, जुहू गाव नोडमध्ये 4, तुर्भेमध्ये 2, सानपाडा विभागात 1, सरसोळे विभागात 3, दारावेमध्ये 3, तर नेरूळ जाणीव करावे विभागात 19, बेलापूरमध्ये 5 बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सिडकोच्या वतीने या नोटिसा बजावलेल्यांची आणि बांधकामांची यादीही जाहीर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -