घरमुंबईसिडको अधिकारी, ठेकेदारांवर काळुंद्रे अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

सिडको अधिकारी, ठेकेदारांवर काळुंद्रे अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

पनवेल महानगरपालिका हद्दीतील काळुंद्रे गावातील चेंबरच्या सफाईचे काम सिडकोच्या माध्यमातून ठेकेदारी पद्धतीने सुरू असताना ठेकेदार यांनी खासगीरित्या माणसे कामाला लावून साफसफाई सुरू केली होती. यामध्ये बुधवार, ९ जानेवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास दोन कामगार चेंबरमध्ये उतरल्यानंतर त्यांचा आवाज न आल्याने इतर कामगारांनी चेंबरमध्ये उतरण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे ठेकेदार विलास म्हसकर यांनी स्वतः चेंबरमध्ये उतरून दोघा कामगारांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत ठेकेदाराचाही गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी ग्रामस्थांनी सिडकोवर गुन्हा दाखल करण्याचा आवाज उठवला होता. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी, सायंकाळी उशिरा सिडकोच्या संबंधित अधिर्‍यांविरोधात तसेच मृत ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, तसेच त्यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ व १९९५ चे कलम ३(१), विशिष्ट जातीच्या कामगारांची नेमणूक आणि कोरडी शौचालये यांना प्रतिबंध करणारा कायदा १९९७ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

काळुंद्रे गावचे रहिवासी विलास म्हसकर (रा. नवीन पनवेल) हे सिडकोच्या माध्यमातून ठेका पद्धतीने कामे घेत होते. यावेळी नालेसफाईचे काम बुधवारी सुरू करण्यात आले. यावेळी मृत कामगार संतोष अनंत वाघमारे आणि प्रफुल्ल सबर हे दोघे सर्वप्रथम सीडीच्या माध्यमातून नाल्यामध्ये उतरले. यावेळी कामगार सुरक्षेबाबत योग्य खबरदारी न घेतल्याने ,तसेच त्यांना काम करतेवेळी देखभालीचे आणि संरक्षणाचे साहित्य न पुरवल्याने ,तसेच या सदर कामाचे योग्य प्रकारे नियोजन, देखरेख सिडको विभागामार्फत न झाल्याने हलगर्जी आणि निष्काळजीपणाने तिघांचा मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

यावेळी प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांच्या मते नाल्यामध्ये सांडपाणी सोडले जात असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस निर्माण झाला होता. यामध्ये हे दोन्ही कामगार गुदमरून गेले. यावेळी नाल्याच्यावर उभे असलेले ठेकेदार विलास म्हसकर यांनी त्यांना आवाज दिला असता आतून काहीही प्रत्युत्तर न आल्याने त्यांनी या दोघांना पाहण्यासाठी नाल्यामध्ये प्रवेश केला. मात्र, अवघ्या पाच मिनिटातच म्हसकर हेही या नाल्याची शिकार झाले. दरम्यान, काळुंद्रे येथील शेकापचे पदाधिकारी आर. डी. घरत यांनी सिडको प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षात पत्रव्यवहार करून मलःनिसारण वाहिनीबाबत आवाज उठवला होता. मात्र, काळुंद्रे गावातील नाल्यांमध्ये सांडपाणी सोडल्यामुळे याठिकाणी तिघा जणांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर अर्धा तास उलटून गेला तरी प्रभागातील नगरसेवक यांनी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. लोकप्रतिनिधी आले मात्र, रुग्णवाहिका आली नाही.

याचाच अधिक संताप ग्रामस्थांना आल्याने येथील पालिकेच्या नगरसेवकांविरोधात ग्रामस्थांचा सूर अधिक वाढत गेला. त्यामुळे ग्रामस्थांनी संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल होणे गरजेचे असल्याचा आवाज देत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृत कामगाराचे शव ताब्यात घेणार नसल्याचे धोरण अवलंबले होते. मात्र, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थांना शांत करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी उशिरा सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -