मुंबईकर अनेकदा गटारांची झाकणं उघडी ठेवतात – महापौर

गोरेगावमध्ये उघड्या गटारीत एक चिमुरडा वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली होती. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गोरेगाव येथे घटनास्थळी भेट दिली. मात्र त्यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Mumbai
vishwanath mahadeshwar
महापौर विश्वनाथ महाडेश्वर

गोरेगावमध्ये उघड्या गटारीत एक चिमुरडा वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली होती. या मुलाचा शोध अजूनही लागलेला नाही. दरम्यान आज, गुरूवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गोरेगाव येथे घटनास्थळी भेट दिली. मात्र त्यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या भेटीनंतर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महापौरांनी उघड्या गटारांसाठी मुंबईकरच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले महापौर

‘काल घडलेली घटना दुर्दैवी आहे. एकाच ठिकाणी तो नाला उघडा होता. यासंबंधीचे चौकशीचे आदेश आम्ही दिले आहेत. मुंबईतले अनेक नाले बंदिस्त नाहीत. स्थानिकांकडूनही अनेकदा गटारांची झाकणं उघडी ठेवली जातात.’ अशा घटना घडू नये हे पाहण्याची जबाबदारी जशी महापालिका प्रशासनाची आहे. तशीच मुंबईकरांचीही आहे. मुंबईकरांना सिव्हिक सेन्स सायला हवा. मुंबईकर अनेकदा गटारांची झाकणं उघडी ठेवतात. त्यांचीही दक्ष नागरिक म्हणून काहीएक जबाबदारी आहे की अशा प्रकारे गटारे उघडी करू नयेत. त्याचसोबत प्रशासनातल्या लोकांचीही जबाबदारी आहे.’

काय आहे घटना

मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्वे कडील आंबेडकर चौक या भागातील चाळीत राहणारा दिव्यांश तिकडच्या नाल्यात पडला. ही घटना बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. रात्रीच्या वेळी दिव्यांश घरातून बाहेर रस्त्यावर येत असताना तो उघड्या असलेल्या नाल्यात पडला आणि वाहून गेला. यावेळी मुसळधार पाऊस सातत्याने होत असल्याने या नाल्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने होत होता. नऊ तास उलटले तरी अद्याप या चिमुरड्याचा शोध लागलेला नाही. दिव्यांश बराच वेळ झाला तरी कुठेही दिसत नव्हता. त्यामुळे चिमुरड्याच्या आईने घराजवळील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यानंतर तो नाल्यात पडल्याचे समोर आले.