उल्हासनगर महापालिकेसमोर नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न केल्यामुळे तक्रारदाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर महापालिका कार्यालयासमोर घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या रहिवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Mumbai
Citizens Suicide attempt in Ulhasnagar municipal office
अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न केल्यामुळे तक्रारदाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर महापालिका प्रभाग समितीच्या कार्यालयासमोर या तक्रारदाराने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोविंद लालचंद मौर्य या इसमाला ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगर ५ येथील कैलास कॉलनी परिसरात मुख्य चौकाजवळ गोविंद लालचंद मौर्य हे रहिवाशी राहतात. तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका इसमाविरोधात मौर्य यांनी गेल्या ३ वर्षांपासून अनधिकृत बांधकामाप्रकरणी कारवाई करा अशी तक्रार दाखल केली होती. यासंबंधी त्यांनी महापालिकेच्या विभागांना वारंवार अर्ज आणि विनंत्या करून पाठपुरावा देखील केला होता. मात्र, असे असताना देखील उल्हासनगर महापालिकेचे अनधिकृत बांधकाम विरोधी पथक जाणून बुजून कारवाई करीत नसल्याचा आरोप मौर्य या रहिवाशांनी केला आहे.

महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गोविंद मौर्य यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते. महापालिकेच्या प्रभाग समिती ३ च्या समोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून रॉकेलचा कॅन ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना दिली असता पोलिसांनी मौर्य यांना ताब्यात घेतले आहे.

मौर्य आणि त्याच्या शेजाऱ्याने एकमेकांच्या विरोधात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी केल्या आहेत आणि ती जुनी बांधकामे आहेत, आम्ही योग्य ती कारवाई करूगणेश शिंपी, अनधिकृत बांधकाम विरोधी पथक प्रमुख

गणेश शिंपी यांना निलंबित करण्याची मागणी

उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असून याला अनधिकृत बांधकाम विरोधी पथक प्रमुख गणेश शिंपी हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. शिंपी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणात रंगे हात लाच घेताना अटक केली होती. तरी सुद्धा त्यांना अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचा प्रमुख बनविण्यात आले आहे. सध्याच्या तक्रारी बघता शिंपी यांना निलंबित करून दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे हा पदभार सोपविण्यात यावा. याप्रकरणी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी चर्चा करून शिंपी यांच्यासंदर्भात निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे राधाचरण करोतीया; काँग्रेसचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष


हेही वाचा – पुण्यात मोबाइल गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्या


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here