घरमुंबईसफाई कामगारानं १५ वर्ष बनवलं पालिकेला उल्लू!

सफाई कामगारानं १५ वर्ष बनवलं पालिकेला उल्लू!

Subscribe

एका पठ्ठ्यानं सख्ख्या भावाला मिळालेली महापालिकेची नोकरी तब्बल १५ वर्ष त्याच्या नावाने करून चक्क प्रशासनालाच उल्लू बनवल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर महानगर पालिकेत समोर आला आहे. विशेष म्हणजे, भावाच्या नावाने नोकरी सुरू करून काही वर्षांनी त्याने राजपत्रात नाव बदलून स्वत:चं नावसुद्धा कागदपत्रांमध्ये समाविष्ट करून घेतलं. आणि याचा थांगपत्ताच पालिका प्रशासनाला नव्हता!

लहानपणी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये गेल्यावर अनेकदा मित्राच्या नावाची हजेरी लावण्याच्या प्रकार अनेकांनी केले असतील. सिनेमाचं तिकीट काढलेला एक मित्र नाही आला, तर त्याच्या तिकीटावर दुसऱ्याने पाहिलेला सिनेमा आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. एवढंच काय, रेल्वेमध्ये एकाच्या नावाने आरक्षित केलेल्या तिकिटावर ऐनवेळी प्लान बदलला म्हणून भलतीच व्यक्ती प्रवास करतानाही अनेकदा पाहायला मिळते. पण एका पठ्ठ्यानं सख्ख्या भावाला मिळालेली महापालिकेची नोकरी तब्बल १५ वर्ष त्याच्या नावाने करून चक्क प्रशासनालाच उल्लू बनवल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर महानगर पालिकेत समोर आला आहे. विशेष म्हणजे, भावाच्या नावाने नोकरी सुरू करून काही वर्षांनी त्याने राजपत्रात नाव बदलून स्वत:चं नावसुद्धा कागदपत्रांमध्ये समाविष्ट करून घेतलं. आणि याचा थांगपत्ताच पालिका प्रशासनाला नव्हता!

पालिकेला गंडवलं, कागदपत्रांमध्येही फेरफार!

रमेश भानुदास अढांगळे या कामगाराची २ नोव्हेंबर १९९६ रोजी उल्हासनगर महानगर पालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणुन  नियुक्ती झाली होती. रमेश तिथे रुजूही झाला. २००३मध्ये त्याला गोरेगावच्या आदिवासी एकात्मिक प्रकल्प येथून चतुर्थ श्रेणी विभागाच्या नोकरीचा कॉल आला. त्यावर या पठ्ठ्यानं गोरेगावची नोकरी स्वीकारली. पण उल्हासनगर महानगर पालिकेच्या नोकरीचा राजीनामा त्यानं दिलाच नाही. त्याच्या या कृत्याबाबत कुणालाही काहीही खबरबात लागली नाही. याचाच फायदा घेऊन त्यानं त्याचा भाऊ राजेंद्र अढांगळेला महापालिकेत नोकरीला पाठवलं. पहिले काही दिवस राजेंद्र रमेशच्याच नावाने नोकरी करत होता. नंतर महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नावात बदल करून त्यानं राजेंद्र अढांगळे हे मूळ नाव धारण केलं.

- Advertisement -

हेही वाचा – भाजप आमदार बंब खोट्या तक्रारी करून करतात कमाई


नगरसेवकानं केला ३ वर्ष पाठपुरावा

दरम्यान, हा प्रकार सुरू असल्याचं समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तत्कालीन उल्हासनगर मनपा आयुक्त मनोहर हिरे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना चौकशीचे आदेश दिले. खरा प्रकार समोर आल्यानंतर मुख्य लिपिक अच्युत सासे यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अखेर राजेंद्रविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल ३ वर्षांच्या पोलिस तपासानंतर त्याची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात आली.

- Advertisement -

भावालाही तुरुंगात टाका

दरम्यान, ‘रमेश अढांगळे याच्या नावावर राजेंद्र नोकरी करत होता. त्यामुळे रमेशलाही अटक करण्यात यावी’, अशी मागणी याप्रकरणाचा पाठपुरावा करणारे नगरसेवक भरत गंगोत्री यांनी केली आहे. या दोघा भावांनी महाराष्ट्र शासन, उल्हानगर महानगरपालिका आणि आदिवासी एकात्म प्रकल्प विभाग यांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच या संपूर्ण प्रकरणात दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया गंगोत्री यांनी दिली आहे.


हेही वाचा – लाच घेणार्‍या मनपा अधिकार्‍यांना तीन वर्षे जेल


 

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -