घरमुंबईमुख्यमंत्री म्हणतात 'मी पुन्हा येणार', मग शिवसेनेला काय?

मुख्यमंत्री म्हणतात ‘मी पुन्हा येणार’, मग शिवसेनेला काय?

Subscribe

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. 'मी पुन्हा येणार', असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागायचे आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांमध्ये देखील राज्यात भाजप-शिवसेना युती होणार असल्याचं या पक्षाचे नेते कंठरवाने सांगत आहेत. त्यातच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे ‘आमचं ठरलंय’, असं त्याहून मोठ्या आवाजात सांगत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच कानठळ्या बसल्या असण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यांचा आवाज मोठा जरी नसला, तरी त्यांचं वक्तव्य अतिशय स्पष्ट आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार या भ्रमात राहाणाऱ्या सर्वांसाठी सूचक इशारा देणारं होतं यात शंका नाही. मुंबईत सुरू असलेल्या भाजप विशेष कार्यसमिती बैठकीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पुढच्या मुख्यमंत्रपदाबाबत ‘मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे, मी पुन्हा येणार त्यामुळे काळजी नसावी. तुम्ही याचा विचार करू नका, तुम्ही कामाला लागा’, असं वक्तव्य करून जर भाजपची सत्ता आली, तर पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच आणि तेही स्वत: देवेंद्र फडणवीसच होणार, हे स्पष्ट केलं आहे.

CM Banners in Mumbai
भाजपच्या विशेष कार्यसमितीच्या ठिकाणी अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बॅनर्स झळकले होते!

आपलं काम बोलत असतं…

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यंमंत्र्यांनी काही सूचक वक्तव्य देखील केली. ‘विधानसभध्ये युती होणार त्यामुळे
कुठलीही जागा आपल्याकडे येऊ शकते. मुख्यमंत्री पदावर कुठलीही लढाई नको. मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवेल त्यामुळं बोलायची आवश्यकता नाही. आपलं काम बोलत असतं’, असं सांगतानाच पुन्हा एकदा आपणच मुख्यमंत्री होणार, असे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ‘मी काय एकट्या भाजपाचा मुख्यमंत्री आहे का? मी भाजपासोबत शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे. त्यामुळे काळजी करू नका’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा!

तिकीट इच्छुकांना भरला दम!

यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि इतर मित्रपक्षांमधल्या सर्वच तिकीट इच्छुकांना आणि त्यांच्यासाठी शब्द टाकणाऱ्यांना चांगलाच दम भरला. ‘कुणीही मुंबईला तिकिटांसाठी येऊ नका. जर कुणी तिकिटासाठी मुंबईत आलं, तर तिथेच त्यांचा एक गुण कमी होईल. इथे कोणत्याही जवळच्या माणसाला तिकीट मिळणार नाही. स्थानिकांना विचारून योग्यता पाहूनच तिकीट दिलं जाईल’, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, ‘आपण पराभूत झालेल्या विरोधकांसमोर लढत आहोत. त्यामुळे उगीच वाद नकोत’, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -