मराठा आरक्षणाचं काय होणार? मुख्यमंत्री म्हणाले, ‘येत्या २ दिवसांत निर्णय घेणार’!

cm uddhav thackeray

सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यानंतर त्यासंदर्भात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत पुढे काय पावलं उचलावीत, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी या मुद्द्याशी निगडित सर्व घटकांशी, तसेच सर्वपक्षीय नेत्यांशी देखील चर्चा केली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकार कोणती पावलं उचलणार, याविषयी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठक संपल्यानंतर दिली. तसेच, ‘यासंदर्भातला आराखडा सध्या आम्ही बनवत असून येत्या २ दिवसांत त्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल’, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘सरकार मराठा समाजासोबत खंबीरपणे आहे. येत्या २ दिवसांत यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत विरोधकांशी देखील चर्चा केली आहे. मराठा आरक्षण हा वादाचा मुद्दा उरलेला नसून सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काही गोष्टी ठरवल्या आहेत. त्यामुळे आंदोलन करण्याचा प्रश्नच नाही. जी वकिलांची टीम मराठा आरक्षणासाठी आधीच्या सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडत होती, तीच टीम यापुढेही मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात राज्य सरकारची भूमिका मांडणार आहे’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘मराठा आरक्षणावर विरोधक सरकारसोबत’

दरम्यान, ‘गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठासमोर जाण्याची आपली मागणी मान्य केली आहे. त्यामध्ये शैक्षणिक प्रवेशासाठी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. याबाबत सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. ज्यांनी यावर याचिका केल्या आहेत, त्यांच्याशी देखील बोलणी झाली आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेली समिती सर्वच घटकांशी चर्चा करत आहे. विरोधकांनी याबाबत सरकारसोबत असल्याचं वचन दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्यातल्या सर्वपक्षांनी एकत्र मिळून घेतला आहे’, असं देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

‘मराठा आरक्षणाबाबत विधि तज्ज्ञांशी चर्चा सुरू’

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात नेमकी कशी आणि काय भूमिका घ्यावी, यावर विधि तज्ज्ञांशी सरकारची चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ‘पुढची न्यायालयीन लढाई कशी करायची आणि त्या लढाईचा निकाल लागेपर्यंत मराठा समाजातील तरूण-तरूणींसाठी काय करता येईल, याचा एक आडाखा तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्व संबंधित घटकांशी बोलून त्यावर निर्णय घेतला जाईल. विधि तज्ज्ञांचं देखील याबाबत मत घेतलं जात आहे. शिवाय, पुढील न्यायालयीन लढाईबाबत कसं पाऊल टाकला येईल, यावर देखील विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा झाली’, असं ते म्हणाले.