Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

लसीकरणाविषयी पंतप्रधानांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

Related Story

- Advertisement -

देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी. सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी लस उपलब्धता, तिची व्यवस्थित वाहतूक, साठवणूक आणि प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भात तयारीविषयी माहिती घेतली. आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात माहिती दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम देशात होत आहे. राज्यात देखील त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयातून ही मोहिम यशस्वी करावी. पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी यांना तर त्यानंतर दुसऱ्या गटातील पोलिस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदीं फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले जाईल,असे ठाकरे यांनी सांगितले. राज्यभर लस वाटपाची प्रक्रिया, त्याची वाहतूक तसेच लस योग्य त्या तापमानात ठेवली जाईल याची दक्षता याबाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  लसीकरण मोहिम सुरू झाल्यावरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. लसीकरणांनतरही कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisement -