‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, तुम्ही निश्चिंत राहा’; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत सूचना

Mumbai
shivsena
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असून सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. महायुतीचे दोन प्रमुख पक्ष भाजप आणि सेना यांच्या युती झाली असली तरी सत्ता स्थापनेवर काही एकमत होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींनंतर आज, शुक्रवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना भवनात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, तुम्ही निश्चिंत राहा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्याचे सांगितले जात आहे. त्याचसोबत या बैठकीत शेकऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात मदत केंद्र उभे करा, असा सूचना जिल्हाप्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हाप्रमुखांना ओल्या दुष्काळ असलेल्या गावांमध्ये मदत केंद्र उभारण्यासही त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या विजयी आमदारांची बैठक काल मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत सत्तास्थापनेमध्ये शिवसेना नक्की काय भूमिका घेणार? याची उत्सुकता होती. त्यावर अखेर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता शिवसेनेने चेंडू भाजपकडे टोलवला असून भाजपच्या भूमिकेची प्रतिक्षा आहे. दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांना पुढील निर्णय होईपर्यंत रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आजच्या घडामोडींनुसार रंगशारदावरील सर्व आमदारांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार असून त्यासाठी रंगशारदेबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सेनेच्या दोन प्रमुख नेत्यांकडे आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या देखरेखीखाली आमदारांचे स्थलांतर होत आहे.

हेही वाचा –

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं – नितीन गडकरी