मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर कंटेनरमधून कॉईल कोसळल्या; पाऊण तास वाहतूक बंद

कंटेनरमधून कॉईल कोसळल्याने पाच किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा

Mumbai

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर अमृतांजन पुलाजवळ कंटेनरमधील तीन कॉईल मार्गावर कोसळल्या आहेत. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर कॉईल हटवण्यात आल्या आहेत. मात्र, पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आज शनिवार असल्याने चाकरमान्यांची मोठी गर्दी या मार्गावर असते.


हेही वाचा- मध्य रेल्वेत भटक्या कुत्र्याचा लेडीज डब्यातून प्रवास

अशी घडली घटना

आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरमधून अवजड तीन कॉईल अचानक द्रुतगतीमार्गावर कोसळल्या. यातील एक कॉईल पाठीमागून येणाऱ्या ट्रकला धडकली. या घटनेत कोणतीही सुदैवाने जीविहिहानी झालेली नाही. या घटनेमुळे तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास वाहतूक थांबवून अवजड कॉईल बाजूला घेतल्या आहेत. यासाठी पाऊण तास पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. यामुळे वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा लागल्या आहेत. बॅकलॉग भरून येण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे पोलीस म्हणाले आहेत. त्यामुळे पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ही कासवगतीने सुरू आहे.