वसईतील तरुणाला श्रीगणेशाचा ध्यास

संकलित केले गणपतीचे 35 हजार फोटो

Vasai
हरेश पारेख

बुद्धीची देवता श्री गणेशाचे निरनिराळे फोटो संकलीत करून त्याची उपासना करण्याचा छंद वसईतील एका तरुणाने जोपासला असून त्याने आतापर्यंत 35 हजार फोटोंचा संग्रह केला आहे. वसईतील आनंदनगरात एकत्र कुटुंबात राहणार्‍या हरेश पारेखला वयाच्या 12 व्या वर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी या राजाच्या फोटोचा अल्बम पाहून त्यालाही फोटो संकलीत करण्याचा छंद लागला.

मागील 11 वर्षापासून तो श्री गणेशाचे फोटो गोळा करीत आहे. आतापर्यंत त्याने 35 हजार गणपतींचे फोटो संकलीत केले आहेत. गणपतीची ही आगळी वेगळी भक्ती करण्यातच आपले करिअर करण्याचे त्याने ठरवले आहे.गणपतीचे विविध फोटो गोळा करण्यासाठी त्याने फोटो फ्रेम मेकींगचा मार्गही निवडला आहे. नालासोपार्‍यातील दुकानात फोटो फे्रमचा व्यावसाय तो करतो. त्यातून मिळालेले उत्पन्न फक्त गणपतीचे फोटो संकलीत करण्यासाठी तो खर्च करीत आहे. आपल्या मुलाच्या या वेगळ्याच छंदाला त्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबानेही जीवापाड साथ दिली आहे. छोट्याशा घरात रहात असतानाही गणपतींचे फोटो निटनिटके रहावेत यासाठी हरेशने पुस्तक वजा अल्बममध्ये त्यांची मांडणी केली आहे. आतापर्यंत अशी 75 पुस्तके त्याने कपाटात ठेवली असून त्या कपाटात यापुढे फक्त गणपतीच्या संकलित छायाचित्राचे अल्बम ठेवण्याचे त्याने ठरवले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार हितेंद्र ठाकुर यांच्यासह अनेक मातब्बरांनी हरेशच्या छंदाचे कौतुक केले आहे. लालबागच्या राजाची मूर्ती घडवणारे रत्नाकर कांबळी, त्यांचे सुपुत्र संतोष कांबळी यांच्याशी झालेली भेट ही सर्वोत्तम असल्याची कृतज्ञता त्याने व्यक्त केली आहे. आपला हा 35 हजारी गणपतींचा अल्बम महानायक अमिताभ बच्चन, खिलाडी अक्षयकुमार आणि नाना पाटेकर यांना दाखवण्याची त्याची इच्छा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली असून गेल्या वर्षी 28 मार्चला हरेशने मोदींना पत्रही पाठवले होते. गेल्या वर्षभरापासून त्यांचे उत्तर येण्याची तो आतुरतेने वाट पाहत आहे.