घरमुंबईकॉलेज निवडणूक आचारसंहिता जाहीर

कॉलेज निवडणूक आचारसंहिता जाहीर

Subscribe

राजकीय हस्तक्षेप आढळल्यास उमेदवारी होणार रद्द

मुंबईसह राज्यातील कॉलेज विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या कॉलेज निवडणुकांचे बिगूल यंदा अखेर वाजले आहेत. या कॉलेज निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठांना दिल्या असून या कॉलेज निवडणुकांसाठी आचारसंहिता निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आपलं महानगरच्या हाती आली आहे. विशेष म्हणजे, या आचारसंहितेची अंमलबजावणी या निवडणुकीच्या काळात कोणत्याही उमेदवारांकडून राजकीय हस्तक्षेप आढळून आल्यास थेट उमेदवारी अर्जच रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील एका उच्च अधिकार्‍यांनी आपलं महानगरला दिली.

गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीनंतर राज्यभरातील कॉलेजांतील बंद झालेल्या विद्यार्थी निवडणुकांना यंदापासून मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार गेल्यावर्षी २६ ऑक्टोबर यासंदर्भातील अध्यादेश जाहीर करण्यात आले होते. मात्र गेल्यावर्षी या निवडणुका न झाल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली होती.

- Advertisement -

त्यानंतर आता यंदाच्या शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर या निवडणुकीसंदर्भात राज्य उच्च शिक्षण विभागाने या निवडणुकीसंदर्भात नुकतीच एक बैठक घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व विद्यापीठांनी ३१ जुलैपूर्वी कॉलेज निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. हे वेळापत्रक जाहीर करताना सप्टेंबरपूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुका पूर्ण कराव्यात असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार या कॉलेजांच्या निवडणुकीच्या आचारसंहिता निश्चित करण्यात आल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

या आचारसंहितेनुसार कोणत्याही उमेदवाराला राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचे बोधचिन्ह वापरता येणार नाही. त्याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारचे मेळावे किंवा मिरवणूक काढण्यासदेखील मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीमधून राजकारणाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, या निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर करताना कोणत्याही उमेदवाराने पॅनेल तयार करू नये, अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. तर वर्ग प्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारामागे १००० रुपये आणि राखीव प्रवर्गाच्या प्रतिनिधीच्या निवडणुकीसाठी उमेदवारामागे जास्तीत जास्त ५ हजार रुपयांचा खर्च मर्यादित ठेवण्यात आला आहे. तर कोणत्याही उमेदवाराने निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान कोणताही धर्म, जात, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे किंवा संघटनेचे चिन्ह, बोधचिन्ह वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तर उमेदवारांना विद्यार्थ्यांच्या गटांमधील मतभेद विकोपास जातील किंवा परस्पर द्वेष, शत्रूत्व आणि तणाव निर्माण होईल, असे कोणतीही कृत्य करणार नाही, याची पुरेशी खबरदारी घेण्याची सूचनाही यावेळी केली आहे.

दरम्यान, या आचारसंहितेची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच विद्यापीठ आणि कॉलेज स्तरावरील अधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच घेण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

ज्यात वरील आचारसंहितेचा विशेष करुन राजकीय हस्तक्षेप करणार्‍या उमेदवारांची थेट उमेदवारी अर्ज बाद करण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून देण्यात आला आहे. तर कॉलेज निवडणुकांची जबाबदारी प्राचार्यांवर देण्यात आली असून विद्यापीठाच्या जबाबदारी प्रकुलगुरुंवर देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -