घरमुंबईविद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी कॉलेज सरसावले

विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी कॉलेज सरसावले

Subscribe

दहावीचा निकाल कमी लागल्याने यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी समुपदेशकांकडे धाव घेतली. पण अकरावी व तेरावीची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली तरीही अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाखा निवडीबाबत संभ्रम आहे. ही बाब ध्यानात घेऊन नामांकित कॉलेजांमध्ये असलेले समुपदेशन केंद्र आता विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी कॉलेजांचा समुपदेशन केंद्रातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

दहावीचा निकाल घसरल्याने राज्य बोर्डातील फारच कमी विद्यार्थ्यांनी नव्वदीचा आकडा ओलांडला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नामांकित कॉलेजचे मार्ग बंद झाल्याने त्यांच्या समोर आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची शक्यता कमी झाली. त्यामुळे आता कोणती शाखा निवडायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. आपल्याला प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.

- Advertisement -

यातून मार्ग काढण्यासाठी काही विद्यार्थी व पालकांनी समुपदेशकांचा मार्ग स्वीकारला. मात्र प्रत्येकालाच समुपदेशकाकडे जाणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी थेट कॉलेज गाठत तेथील शिक्षकांकडूनच सल्ला घेण्याचा मार्ग स्वीकारला. पालक व विद्यार्थ्यांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कॉलेजांमध्ये मुलांची शैक्षणिक प्रगती व त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी असलेल्या समुपदेशकांना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीचे मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केले आहे. मुंबईतील बहुतांश कॉलेजमध्ये कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, इंजिनिअरिंग, मेडिकलसाठी काय करावे असे अनेक प्रश्न घेऊन विद्यार्थी येत आहेत.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रथम पालक, मग पालक व विद्यार्थी आणि अखेर विद्यार्थी अशा प्रकारे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना नेमकी कशामध्ये रुची आहे हे स्पष्ट होण्यास मदत होत असल्याचे समुपदेशकांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

अभ्यासक्रम निवडण्याबाबत अनेक विद्यार्थी दररोज आमच्याकडे येत असतात. ही बाब लक्षात घेऊन आम्ही प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्येबाबत कॉलेजमध्ये समुपदेशाची व्यवस्था केली आहे. आमच्या कॉलेजमधील दोन समुपदेशक त्यांना मार्गदर्शन करून त्यांचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी मदत करतात. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
– डॉ. अनुश्री लोकूर, प्राचार्या, रुईया कॉलेज

विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी आमच्या समुपदेशाकडून त्यांना मदत करण्यात येते. प्रवेशाबाबत विचारण्याबाबत रोज अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये येत असतात. त्यांची गरज ओळखून आम्ही त्यांना समुपदेशन करतो.
– डॉ. राजपाल हांडे, प्राचार्य, मिठीबाई कॉलेज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -