घरमुंबईकपडेवाली ते ‘मिस कानपूर’

कपडेवाली ते ‘मिस कानपूर’

Subscribe

एकीकडे मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला असताना ज्या समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे त्या समाजातील लोकांना त्याचा फायदा आजही होत नसल्याचे समोर आले आहे. व्हीजेएनटीचे लाभ मिळणार्‍या वाघरी देवीपूजक समाजातील निहारिका गोविंद खारवा या युवतीला आर्थिक परिस्थितीमुळे आपले शिक्षण सोडावे लागले.

एकीकडे मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला असताना ज्या समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे त्या समाजातील लोकांना त्याचा फायदा आजही होत नसल्याचे समोर आले आहे. व्हीजेएनटीचे लाभ मिळणार्‍या वाघरी देवीपूजक समाजातील निहारिका गोविंद खारवा या युवतीला आर्थिक परिस्थितीमुळे आपले शिक्षण सोडावे लागले. त्यानंतरही तिने जिद्द न सोडता ‘मिस कानपूर २०१७’ हा पुरस्कार मिळवला आहे. विक्रोळी टागोर नगर येथे राहणार्‍या निहारिकाला आपल्या समाजातील शाळाबाह्य मुलांसाठी खूप काही करण्याची इच्छा आहे.

मी वाघरी म्हणजेच देवीपूजक समाजातील मुलगी आहे. आमचा समाज विशेष करून गुजरात अहमदाबाद येथे आहे. या समाजातील लोकांना कपडे विकणारा समाज म्हणून ओळखले जाते. या समाजातील लोक सुरुवातीला मस्जिद बंदर स्थानकाजवळील फुटपाथवर दातून, जिरे, काळीमिरी, तेजपत्ता विकायचे. नंतर रत्नागिरी आणि गोव्याला जाऊन काजू, बदाम, खारीक, खजूर आणून विकायचे. गेल्या काही वर्षांपासून आमच्या समाजातील काही लोक घरोघरी जाऊन लोकांकडून जुने कपडे घेऊन भांडी देण्याचा तर सुरतहून कपडे आणून मुंबईमध्ये विकायचा व्यवसाय करत आहेत. आमच्या समाजातील लोकांना दिवसभर ४० ते ५० किलोहून अधिक वजनाचे कपड्याचे गाठोडे घेऊन विविध ठिकाणी जाऊन व्यवसाय करावा लागतो. असा व्यवसाय माझी आई करायची, मीही तिच्याबरोबर कपडे विकायला जायची. हा व्यवसाय करताना नवरा, बायको आपल्या मुलांना घेऊन फिरत असल्याने लहान मुले शाळेपासून दूर राहतात. यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत निहारिकाने व्यक्त केली.

- Advertisement -

माझ्या आजोबांच्या काळात जबरदस्तीने नोकरी दिली जायची. माझ्या आजोबांना मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अशीच नोकरी लागली होती. माझ्या वडिलांनी (गोविंद तलसी खारवा) आयटीआय केल्याने त्यांना रेल्वेमध्ये मेंटेनन्स विभागात नोकरी लागली. माझे शिक्षण सुरु झाले. मी बीएस्सी केले. पुढे निर्मला निकेतनमधून सोशलवर्कचे शिक्षण घेत होते. त्याचवेळी घरची आर्थिक परिस्थिती खालावल्याने मला डिप्लोमा पूर्ण करता आला नाही. घरात आर्थिक मदत व्हावी म्हणून मी घरात खाजगी क्लासेस सुरू केले. दरम्यान, माझ्या मित्र आणि मैत्रिणींमुळे मी कानपूरला गेले. तेथे मॉडेलिंग करताना मिस कानपूर स्पर्धेत भाग घेतला. ‘मिस कानपूर २०१७’ म्हणून माझी निवड झाली. पुढे मी मॉडेलिंग करत काही जाहिरातीसाठी शूट केले. मात्र माझ्या आईची तब्येत बिघडल्याने मला पुन्हा मुंबईत यावे लागले. मुंबईत आल्यावर मला माझ्या समाजातील लोक आजही आहेत, त्याच परिस्थितीत असल्याचे दिसले. यामुळे या समाजासाठी काही करण्याची इच्छा असल्याचे निहारिका सांगत होती.

वाघरी देवीपूजक समाजाला व्हीजेएनटीच्या सुविधा मिळतात. या सुविधा मिळण्यासाठी त्यांना जातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी १९५० चा वास्तव्याचा पुरावा मागितला जातो. जो समाज शिकलाच नाही, जो समाज व्यवसायासाठी दिवसभर बायका मुलांना घेऊन घराघरात जाऊन कपडे विकतो. त्याच्याकडे पुरावा नसल्याने समाजातील लोकांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. माझे आजोबा मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला असल्याने माझ्या वडिलांनी १९५० चा पुरावा सादर करून जातीचे प्रमाणपत्र मिळवले. आता माझेही प्रमाणपत्र बनत आहे. मी मॉडेलिंग करून शूट करून माझे घर चालवू शकते, पण माझ्या समाजाचे काय ? माझ्या समाजातील मुलांना शिक्षण मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मला काम करायचे आहे. आमच्या समाजातील लोकांना आधार कार्ड, पॅन कार्ड काढायचे कसे हे माहीतही नाही, ते जातीचे प्रमाणपत्र कसे काढणार? असा प्रश्न उपस्थित करून सरकारने आमच्या समाजातील मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याच्या अटींचा पुनर्विचार करावा, असे आवाहन निहारिकाने केले आहे.

ते चोर नाहीत

आमच्या समाजातील लोक गुजरातमधील सुरतला सकाळी ५ वाजता कापडे आणायला जातात. येताना ८० ते १०० किलोची कपड्यांची ओझी आणतात. रेल्वे पोलीस त्यांना चोर म्हणून पकडतात. त्यांच्याकडून पैसे मिळत नाहीत तोवर बसवून ठेवले जाते. १०० ते २०० रुपये दिल्यावर सोडून दिले जाते. आमचा समाज व्यवसाय करणारा समाज आहे. तो चोर नाही. यामुळे पोलिसांनी त्यांना उगाच त्रास देऊ नये 

– निहारिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -