ड्रग्जप्रकरणी कॉमेडियन भारती सिंहला अटक!

comedian bharti singh

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता थेट कॉमेडियन भारती सिंह पर्यंत येऊन पोहोचली आहे. या प्रकरणात सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीची ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्यानंतर चित्रपट सृष्टीतल्या अनेक सेलिब्रिटींची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता कॉमेडियन भारती सिंह हिची चौकशी केली जात होती. मात्र, आता भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. भारती सिंहच्या घराची झडती घेतल्यानंतर तिथे एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाला ८६ ग्रॅम गांजा सापडला होता. त्यानंतर एसीबीनं भारती सिंह आणि तिच्या पतीला चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात बोलावलं होतं. आज दुपारी भारती सिंह आणि तिचा पती हर्ष एनसीबीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली. या चौकशीमध्ये भारती सिंह आणि तिच्या पतीने आपण ड्रग्जचं सेवन केल्याचं मान्य केलं. यानंतर भारती सिंहला अटक करण्यात आली. दरम्यान, हर्षची चौकशी सुरू असून त्याला देखील अटक होण्याची शक्यता आहे.

२१ नोव्हेंबर रोजी एनसीबीने खारदांडा परिसरातून एका ड्रग्ज ट्रॅफिकरला अटक केली होती. त्याच्याकडून १५ ब्लॉट, ४० ग्रॅम गांजा आणि नायट्राझेपम सापडलं होतं. त्याची चौकशी केल्यानंतर एनसीबीनं भारती सिंगचं घर आणि प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकला. या छाप्यामध्ये ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. चौकशीमध्ये भारती सिंगनं ड्रग्जचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे एनडीपीएस कायद्यान्वये तिला अटक करण्यात आली असून तिचा पती हर्ष लिंबाचिया याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती एनीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली आहे.