भारती सिंह पाठोपाठ पती हर्षलाही एनसीबीकडून अटक

एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत भारती आणि हर्षने ड्रग्ज घेण्याबाबत कबुली दिली.

भारती सिंह पाठोपाठ पती हर्षलाही एनसीबीकडून अटक

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यानंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी एनसीबीने छापा टाकला होता. त्यानंतर शनिवारी ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने सगळ्यांना आपल्या विनोदी शैलीने हसविणारी कॉमेडियन भारती सिंहला अटक केली असून तिच्या पाठोपाठ आता पती हर्ष लिम्बाचिया याला देखील अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.

शनिवारी भारती आणि हर्षच्या घरी एनसीबीने छापा टाकला. तेव्हा त्यांच्या घरी ८६ ग्रॅम गांजाला सापडला होता. माहितीनुसार, एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत भारती आणि हर्षने ड्रग्ज घेण्याबाबत कबुली दिली आहे.घरात गांजा सापडल्यानंतर भारती आणि हर्षला एनसीबीचे समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलवण्यात आले होते. शनिवारी रात्री चौकशी झाल्यानंतर भारती सिंहला अटक करण्यात आली होती.

तसेच भारती आणि हर्षच्या नोकराची देखील चौकसी करण्यात आली. दोघांनी जिथून ड्रग्ज मागवले होते त्याचा सोर्स देखील एनसीबीला समजला आहे. भारतीला अटक केल्यानंतर एनसीबी कार्यालयात रात्रभर ठेवण्यात आले. तिथे तिची चौकशी करण्यात आली. भारतीची आई तिला भेटण्यासाठी एनसीबी कार्यालयात पोहोचली होती, पण तिच्या आईला भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. आज भारतीला कोर्टात समोर आणले जाणार आहे. आता कोर्ट याप्रकरणी काय निर्णय घेईल हे पाहण्यासारखे आहे.


हेही वाचा – माझा प्रोजेक्ट खराब करू नका, मधुर भांडारकरांनी केली विनंती