Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाईचे आयुक्तांचे आदेश!

कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाईचे आयुक्तांचे आदेश!

Related Story

- Advertisement -

शहर सुशोभिकरणाप्रमाणेच नियमित स्वच्छतेचे महत्व मोठे असून ‘झिरो गार्बेज ऑन रोड’ अर्थात कचरामुक्त रस्ते ठेवण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे, असे सूचित करतानाच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी नागरिकांकडून ओला व सुका असा वर्गीकरण करूनच दिला जावा हे कचरा संकलन करणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत दररोज नागरिकांना सांगितले जावे असे निर्देश दिले. देशात प्रथम क्रमांकाचे ध्येय नजरेसमोर ठेवताना नागरिकांचे १०० टक्के सहकार्य गरजेचे असून त्यांचे संपूर्ण सहकार्यच स्वच्छतेमध्ये १०० टक्के यश मिळवून देऊ शकते. नागरिकांनी घरातच कचरा ओला व सुका असा वेगवेगळा ठेवणे व तसाच वेगवेगळा देणे घनकचरा नियमानुसार अनिवार्य असून असे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटी, वसाहती यांचा कचरा उचलला जाणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांना दिला जावा, आणि तरीही सुधारणा न झाल्यास त्यांच्याकडून दंडात्मक वसूली करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.

स्वच्छतेमध्ये प्रामुख्याने कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण केले जाणे आणि दररोज ५० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, वसाहती यांनी त्यांच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे या दोन महत्वाच्या गोष्टी असून त्याकरिता नागरिकांचे संपूर्ण योगदान अपेक्षित आहे. त्यादृष्टीने नागरिकांशी विविध माध्यमांतून सतत संवाद ठेवावा असे आयुक्तांनी सूचित केले.

- Advertisement -

याकरिता कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया याविषयी सोसायट्यांमध्ये छोट्या स्वरुपात कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि त्यामधून नागरिकांना स्वच्छतेमध्ये त्यांची असलेली महत्वाची भूमिका सतत लक्षात आणून देणे गरजेच असून विभाग स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रावर सोसायट्यांना सातत्याने भेटी द्याव्यात व त्यांच्याशी संवाद साधून प्रबोधन करावे असे आयुक्तांनी सांगितले. या कामात एन.सी.सी.चे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य घ्यावे. तसेच याबाबतचा कृती आराखडा तयार करून आठवड्याभरात सादर करावा असे विभाग अधिकारी यांना सूचित करण्यात आले.

चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वत:पासूनच करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या घरी कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे. याचे फोटो काढून समाज माध्यमांवर प्रदर्शित करावेत आणि इतरांनाही तसे करण्यास आवाहन करावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या. तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी ज्या सोसायटी, वसाहतीत राहतात तेथील कचरा वर्गीकरण व कचऱ्यावरील प्रक्रिया याची जबाबदारी त्यांनी घ्यावी असेही आयुक्तांनी सूचित केले.

- Advertisement -

मोकळ्या जागांवरील डेब्रीजमुळे शहर अस्वच्छ दिसते. त्यामुळे त्या मोकळ्या जागा साफ करून घ्याव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. अशाचप्रकारे रस्त्यांवर अनेक दिवस धूळ खात उभी असलेली बेकायदेशीर वाहने उचलण्याचेही निर्देश त्यांनी दिले. प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करताना दंडवसूली हा आपला मुख्य उद्देश नाही, तर प्लास्टिकचा वापर होता कामा नये हे उद्दिष्ट आहे. हे सुनिश्चित करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पुढील १० दिवसात करण्यात याव्यात. परंतु त्यानंतर प्लास्टिकचा वापर होताना दिसला तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होते हे लक्षात घेऊन उद्यापासून पुढील चार दिवस संपूर्ण महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग हटाव मोहिम राबवावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. सध्या शहरात सुरू असलेल्या सुशोभिकरणाच्या कामांची नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे, मात्र त्यामुळे आत्मसंतुष्ट न होता अधिक चांगल्या आणि अभिनव संकल्पना राबवून सुशोभिकरण कामे करावीत अशाही सूचना त्यांनी केल्या.

स्वच्छ सर्वेक्षण प्रमाणेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पंचतत्वांच्या अनुषंगाने इतर विषयांच्या सुविधांमधील सुधारणांकडे काळजीपूर्वक लक्ष देत त्यामध्येही वेगळी कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. स्वच्छता ही नागरिकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होणारी गोष्ट नाही त्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करावेत असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना निर्देशित केले.


हेही वाचा – माझ्याही सुरक्षेत कपात करा; शरद पवारांचा गृहमंत्र्यांना फोन


 

- Advertisement -