महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे गोडवे

Mumbai
Pravin Pardeshi and Uddhav Thackeray
महापालिका आयुक्तांनी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक

मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात चक्क मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला. मे २०१९ मध्ये महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेल्या परदेशी यांनी, महाराष्ट्राला मुंबई शहरात जन्मलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे लाभलेले आहेत: मुंबई शहराला आनंदी शहर बनविण्यासाठी ही एक मोठी संधी आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. त्यानंतर या अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मुंबई २०३० या संकल्पनेच्या अनुषंगाने मार्गदर्शन, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, गटनेते, नगरसेवक यांनीही बहुमुल्य सल्ला दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

विशेष म्हणजे आजवर कोणत्याही आयुक्तांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केलेला नाही. परंतु परदेशी यांच्या बदलीचे वारे जोरात वाहू लागल्याने मुख्यमंत्र्यांची मर्जी लाटण्यासाठी हा खटाटोप होता, असेही बोलले जात आहे.

महापालिकेतील मान्यवरांच्या प्रतिक्रिया – 

स्वप्न दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, यात मुंबईकरांसाठी कोणतीही दिशा मिळणार नाही. यामध्ये काहीही नसून आकडे वगळले तर सगळे जुनेच आहे.कचरा करात वाढ करणे ही गंभीर बाब असून आम्ही याचा आकारणी करू देणार नाही. – रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

महापालिकेच्या या अर्थसंकल्पात सर्व विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईला विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. – किशोरी पेडणेकर, महापौर

मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सर्व विभागांचा पूर्ण अभ्यास करून आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे सुरु असलेल्या प्रकल्पांना तसेच योजनांना गती देताना, नवीन प्रकल्प हाती घेण्याचाही विचार केला आहे. मुंबईच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा असाही अर्थसंकल्प आहे. – यशवंत जाधव, अध्यक्ष स्थायी समिती

महापालिका आर्थिक संकटात असताना आयुक्तांनी वाढीव अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे त्यामुळे अर्थसंकल्पाची रक्कम वाढली असली तरी साडेचार हजार कोटींची रक्कम कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे. अर्थसंकल्पाचा आकार मोठा करण्यासाठी थेट राखीव निधीत हात घालणे हे संयुक्तिक नाही. सेवा शुल्कात वाढ आणि सेवा आकाराला आमचा विरोध राहिल. – राखी जाधव, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस, मुंबई महापालिका

 

मुंबई महापालिकेचा हा अर्थसंकल्प फसवा आहे. विकासकामांना चालना देणार नाही. त्यामुळे एकप्रकारे दिवास्वप्न दाखवणारे आहे. कोणताही नवीन प्रकल्प नाही. महसुलातील तूट कशी भरुन काढणार आहेत. बेस्टला २१०० कोटी रुपये देणारे आता १५०० कोटी रुपये देत आहेत. केवळ भरतीच नाही तर कर्मचार्‍यांची बढतीही रोखली जाणार आहे. – प्रभाकर शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप