घरमुंबईवाढीव वीजबिलाची अदाणींकडे तक्रार करा, १० टक्के व्याजाने रक्कम मिळवा

वाढीव वीजबिलाची अदाणींकडे तक्रार करा, १० टक्के व्याजाने रक्कम मिळवा

Subscribe

तुम्ही अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) च्या २७ लाख वीज ग्राहकांपैकी असाल आणि तुम्हाला फुगलेले वीजबिल मिळाले असेल तर नक्कीच तुम्हाला व्याजासह ही रक्कम परत मिळवता येईल. आज राज्य वीज नियामक आयोगाने एईएमएलच्या सरासरी वीज बिलांच्या प्रकरणात ग्राहकांना दिलासा देण्याचे जाहीर केले आहे. वीज मीटर रिडिंगमध्ये फरक जाणवल्यास त्या ग्राहकाला १० टक्के व्याजाने फरकाच्या रकमेचा परतावा देण्यात येईल, अशी माहिती राज्य वीज नियामक आयोगामार्फत देण्यात आली. कायद्यामध्ये अशा फरकाच्या रकमेचा परतावा देण्याची सुविधा असल्याचे स्पष्टीकरण राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिले. वाढीव आणि सरासरी वीजबिलाच्या प्रकरणांच्या निमित्ताने दोन सदस्यीय समिती नेमल्याचेही त्यांनी जाहीर केले.

बेस्ट, टाटा, अदाणी आणि महावितरण (मुंबईतील मुलुंडपर्यंतचे ग्राहक) यांच्या वीज बिलांची तपासणी करण्यासाठी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये माजी सनदी अधिकारी अजित जैन, राज्य वीज नियामक आयोगाचे माजी सदस्य विजय सोनावणे यांचा सामावेश आहे. या समितीकडून अदाणीच्या वीज ग्राहकांच्या बिलाचीही तपासणी करण्यात येईल. एकूण किती ग्राहकांना मीटर रिडिंगमधील तफावत तसेच सरासरी वीजबिलांचा फटका बसला आहे याचा आढावा समितीकडून घेण्यात येईल. तसेच अशा पद्धतीची वीजबिले ग्राहकांना येण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी काय काळजी घेता येईल यासाठीही समिती उपाययोजना सुचवणार आहे. १० डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीतील बिलिंग सायकल तपासण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. सगळ्या वीज ग्राहकांचे वीजबिल अवघ्या ५६ कर्मचार्‍यांच्या मदतीने तपासणे शक्य नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

इंधन दरवाढीचा फटका, बॅलेन्स शीटही तपासणार
ही समिती इंधन समायोजन दर आकारणीचा फटका, तसेच जुनी येणी वसूल झाली आहेत का, अशी माहिती तपासणार आहे. सगळ्याच कंपन्यांची बॅलेन्स शीट या निमित्ताने तपासण्यात येईल. वातावरणातील बदल, यामुळे झालेली वीज वापरातील वाढ यांसारखी कारणेही या समितीच्या माध्यमातून तपासण्यात येतील.

अदाणीने घेतले ४८ तास
२७ लाख ग्राहकांपैकी १ लाख १० हजार ग्राहकांच्या बाबतीत वाढीव वीजबिले पाठवली गेल्याचे अदाणीने स्पष्टीकरण राज्य वीज नियामक आयोगाला दिले आहे. त्यासाठी मुख्यत्वेकरून कारण हे जास्त वीज वापर तसेच वीज ग्राहकांचा वीज वापरातील स्लॅबमधील बदल हे देण्यात आले आहे. राज्य वीज नियामक आयोगाने नेमलेल्या समितीला संपूर्ण आणि पारदर्शकपणे सहकार्य करण्याचे स्पष्टीकरण अदाणीने दिले आहे. तसेच वीज ग्राहकांच्या बिलाशी संबंधित तक्रारीही येत्या दिवसांमध्ये सोडवू ,अशी प्रतिक्रिया अदाणीच्या प्रवक्त्यांनी दिली.

- Advertisement -

अदाणींच्या वीजबिलाची इथे करा तक्रार
अदाणीच्या वीज ग्राहकांना रविवार वगळता खालील ठिकाणी ऑफिसच्या वेळेत वीज बिलासंबंधी तक्रार करता येईल. पुढील तक्रारीची ठिकाणे – कांदिवली, भाईंदर, वांद्रे, चेंबुर, गोरेगाव, एमआयडीसी अंधेरी, अंधेरी पश्चिम, साकीनाका.
हेल्पलाईन क्रमांक – १९१२२
ईमेल – [email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -