घरताज्या घडामोडीविधिमंडळ अधिवेशन सुरू, तरीही महापालिकेचे चिटणीस पद रिक्त

विधिमंडळ अधिवेशन सुरू, तरीही महापालिकेचे चिटणीस पद रिक्त

Subscribe

विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारी सुरू झाले तरी मुंबई महापालिकेच्या चिटणीसपदी अद्यापही प्रशासनाला अधिकाऱ्याची नेमणूक करता आलेली नाही.

विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारी सुरू झाले तरी मुंबई महापालिकेच्या चिटणीसपदी अद्यापही प्रशासनाला अधिकाऱ्याची नेमणूक करता आलेली नाही. अधिवेशनात महापालिकेच्या चिटणीस विभागासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची उत्तर या विभागाचे प्रमुख म्हणून प्रशासन कुणाकडून मागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राजकीय दबावाचे कारण देत चाल ढकल करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना अधिवेशनामुळे तरी या पदावर सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या चिटणीस विनीत चव्हाण या १ सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या. मात्र, हे पद वैधानिक असल्याने ते २४ तासही रिक्त ठेवू नये, अशी प्रथा आहे. या पूर्वीचे चिटणीस प्रकाश जेकटे सेवा निवृत्त झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे ते पद उशिरा भरण्यात आले होते. त्यामुळे जेकटे निवृत्त झाल्यानंतर अनेक दिवसांनी विनीत चव्हाण यांची प्रभारी म्हणून नेमणूक झाली होती. मात्र, स्थायी समिती आणि महापालिकेची एकही सभा न झाल्याने त्यांना प्रभारी म्हणूनच सेवानिवृत्त व्हावे लागले.

- Advertisement -

मात्र, चव्हाण सेवा निवृत्त झाल्यानंतर उपचिटणीस शुभांगी सावंत (मराठी विभाग) आणि उपचिटणीस संगीता शर्मा यांच्यात चिटणीस पदावरून रस्सीखेच सुरू आहे. शर्मा यांचे नाव पुढे आहे. पण, प्रशासनातील अधिकारी हे सावंत यांच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे खाते स्थायी समितीच्या अधिपत्याखाली असले तरी चिटणीस पदावरील व्यक्तीची नियुक्ती करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. मात्र, हे अधिकार वापरताना प्रशासनाने स्थायी समिती अध्यक्षांना विश्वासात घेणेही अपेक्षित मानले जाते. परंतु, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला राजकीय दबाव असल्याचे सांगत ही नियुक्ती लांबणीवर टाकली आहे. आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची या पदावर वर्णी कशी लागेल किंबहुना त्यांना आपली बाजू मंडण्यासाठी कशी संधी मिळेल, यासाठी प्रशासनातील अधिकारी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.

परंतु, सोमवार पासून विधिमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे, आणि चिटणीस सारखे वैधानिक तसेच महत्वाचे पद अद्यापही प्रशासनाकडून भरले गेलेले नाही. त्यामुळे अधिवेशनात प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रशासनाला या दोहोंपैकी जी निकषांची पूर्तता करतात, त्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी नेमणूक करावी लागणार आहे.परंतु, अद्यापही हे पद भरलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Corona : दिलासा! कोरोना चाचणीचे दर आता १२०० रुपये


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -