परीक्षा पाठोपाठ वेळापत्रकातही गोंधळ – मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार

शुक्रवारी एम.कॉमच्या विद्यार्थ्यांना ९ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होत असल्याचे जुने वेळापत्रक विद्यापीठाकडून पाठवण्यात आले.

idol

परीक्षा विभागाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचे कारण देत मुंबई विद्यापीठाने सर्वच परीक्षा परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मात्र शुक्रवारी एम.कॉमच्या विद्यार्थ्यांना ९ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होत असल्याचे जुने वेळापत्रक विद्यापीठाकडून पाठवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली असता त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) परीक्षांमध्ये तांत्रिक अडचण आल्याने गोंधळ उडाला होता. यासंदर्भात परीक्षा विभागाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सर्व विभागाच्या परीक्षा १९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला. मात्र ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या एम.कॉमच्या परीक्षा या पूर्वघोषित वेळापत्रकानुसारच होत असल्याची माहिती विद्यापीठाकडून पाठवण्यात आली. त्यानुसार त्यांचा बिझिनेस मॅनेजमेंट पेपर ३ हा ९ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता असल्याचा मेसेज त्यांना पाठवण्यात आला. तर उर्वरित पेपरचेही जुने वेळापत्रक देण्यात आले. परीक्षा रद्द झाली असल्याचे जाहीर केले असताना विद्यापीठाकडून जुनेच वेळापत्रक विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्याने त्यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला. याबाबत युवासेनेने आक्रमक भूमिका घेत तातडीने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांच्या मनातील द्विधा परिस्थिती कमी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच सायबर हल्ल्याची तक्रार पोलिसांकडे केली की नाही याची माहिती द्यावी, अशी मागणी करणारे पत्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी कुलगुरूंना लिहिले आहे.

परीक्षा गोंधळापाठोपाठ आता विद्यापीठाकडून वेळापत्रकाचाही गोंधळ घातला आहे. विद्यापीठाच्या हेल्पलाईन बंद असल्याने त्यांना कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाने तातडीने सुधारित वेळापत्रक जाहीर करावे.
– प्रदीप सावंत, व्यवस्थापन परिषद सदस्य, मुंबई विद्यापीठ

हेही वाचा – आयडॉल परीक्षेच्या गोंधळाचे खापर शिक्षकांच्या माथी