पवार पुन्हा केंद्रस्थानी

सिल्व्हर ओकवर आघाडीच्या बैठका सुरू, राज्यपालांच्या निर्णयाकडे विरोधकांचे लक्ष

sharad pawar
शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर दुखावलेले उद्धव ठाकरे यांनीही कठोर शब्दांत भाजपवर प्रतिआरोप केले. त्यामुळे आता भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असे समजताच काँग्रेस आघाडीमध्ये सत्तास्थापनेविषयीच्या आशा पल्लवित झाल्या. ताबडतोब काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सिल्वर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. रात्री उशीरा शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवारांची पुन्हा भेट घेतली. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यावर सिल्वर ओक येथे खलबते सुरू झाली असून यात पुन्हा एकदा शरद पवार हे केंद्रस्थानी आले आहेत.

महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा तिढा आणखी वाढलेला असताना शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून शांत बसलेले विरोधक शुक्रवारी संध्याकाळी सक्रिय झाल्याची चिन्हे मुंबईत दिसू लागली. काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी शुक्रवारी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेले सिल्वर ओक गाठत सत्ता संघर्षच्या नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली.

शिवसेना आणि भाजपमधील दुफळी समोर आली असून आता नवा सत्तासंघर्ष राज्यात सुरु झाला आहे. त्यातच राज्यपालांनी इतर पक्षांना अद्याप आमंत्रित केले नसल्याने आता विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी विरोधकांनी आपली आगामी भूमिका ठरण्यासाठी थेट शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान गाठले.यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे तसेच माणिकराव ठाकरे आदी नेते उपस्थित होते.

रात्री उशिरापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही बैठक सुरू होती. या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, शिवसेनेकडून उद्या सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय राहील याविषयी या बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. तर राज्यपालांनी इतर पक्षांना आमंत्रित न केल्याने त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सर्वात जास्त संख्या असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. राज्यपालांनी किमान शिवसेनेला पाचारण करावे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

केंद्र सरकारचा निषेध
राहुल गांधी यांची सुरक्षा कमी केल्याने माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र शब्दात केंद्र सरकारचा निषेध केला. अशामुळे राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याची भीतीही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.