घरमुंबईकाँग्रेस नगरसेविका स्टेफी केणींचे नगरसेवकपद रद्द?

काँग्रेस नगरसेविका स्टेफी केणींचे नगरसेवकपद रद्द?

Subscribe

मुंबईतल्या मालाड भागातल्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी केणी यांचं नगरसेवकपद धोक्यात आलं असून त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला नगरसेवकपद मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक आता वाढणार आहे. मालाड येथील प्रभाग क्रमांक ३२च्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी केणी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने, त्यांच्या जागा दुसर्‍या क्रमांकावरील शिवसेना उमेदवार गीता भंडारी यांची निवड होण्याचा मार्ग खुला झाला आहे. केणी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होणार असल्याने आगामी महापालिका सभागृहात गीता भंडारी यांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेत सध्या चार अपक्षांसह शिवसेनेचे ८८ नगरसेवक आहेत. त्यात मनसेच्या सहा नगरसेवकांची भर पडल्याने ही संख्या ९४ झाली आहे.

उच्च न्यायालयाने दिला होता निर्णय

स्टेफी केणी सध्या मालाडमधून काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई महानगर पालिकेमध्ये निवडून गेल्या आहेत. मात्र, आता त्यांचे जात प्रमाणपत्र आता अवैध ठरवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने याबाबतीत काही दिवसांपूर्वीच निर्णय दिला आहे. या निर्णयाची प्रत महापालिका आयुक्त तसेच कोकण विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. त्यामुळे केणी यांचे नगरसेवकपद जाऊन त्यांच्या रिक्त जागी दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवार शिवसेनेच्या गीता भंडारी यांची वर्णी लावली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘पालिकेचे अधिकारी धनदांडग्यांसाठी की गरीबांसाठी?’

शिवसेनेने लावली फिल्डिंग

यापूर्वी अपक्ष नगरसेवक चंगेझ मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने दुसर्‍या क्रमांकाचे सेनेचे राजू पेडणेकर यांची महापालिका सदस्यपदी निवड झाली आहे. तर सांताक्रूझ येथील सेनेचे सगुण नाईक यांचे जातप्रमाणपत्रही अवैध ठरल्याने दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसच्या रफीक शेख यांची वर्णी लागणार आहे. सगुण नाईक यांचे सदस्यत्व रद्द होऊन दोन महिने उलटत आले, तरी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा केली जात नाही. मात्र, दुसरीकडे काँग्रेस नगरसेविका केणी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होताच शिवसेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यासाठी फिल्डींग लावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -